मुंबई : अमेरिका आणि इराने मधील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाल्याने जागतिक शेअर बाजारांवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. दोन्ही देशांमधील शांतता कराराची शक्यता धूसर झाल्यामुळे जागतिक पातळीवर संमिश्र संकेत मिळत आहेत. याचा थेट फटका भारतीय शेअर बाजाराला बसण्याची शक्यता असून, बुधवारच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांची सुरुवात मोठ्या घसरणीसह (नकारात्मक) होण्याचे संकेत ‘गिफ्ट निफ्टी’च्या आकडेवारीवरून मिळत आहेत.

मंगळवारच्या सत्रात भारतीय शेअर बाजाराने सलग चार दिवसांची घसरण रोखण्यात यश मिळवले होते. आयटी क्षेत्रातील बड्या कंपन्यांमधील तेजी आणि गुंतवणूकदारांनी खालच्या भावात केलेल्या खरेदीमुळे (व्हॅल्यू बायिंग) सेन्सेक्स ३८२.५० अंशांनी (०.५२%) वधारून ७४,६४९.८४ वर, तर निफ्टी ५० निर्देशांक १००.९५ अंशांनी (०.४३%) वाढून २३,४८३.५५ वर बंद झाला होता. मात्र, रात्रीतून बदललेल्या जागतिक समीकरणांमुळे हा हुरूप आज मावळण्याची शक्यता आहे.

‘गिफ्ट निफ्टी’कडून मंदीचे संकेत

आज सकाळी सिंगापूरच्या ‘गिफ्ट निफ्टी’मध्ये तब्बल १३४ अंशांची मोठी घसरण पाहायला मिळाली. गिफ्ट निफ्टी २३,४६९ च्या पातळीवर व्यवहार करत असल्याने देशांतर्गत बाजाराची सुरुवात लाल रंगात (घसरणीसह) होईल हे स्पष्ट होत आहे.

रात्रीतून बदललेली ८ महत्त्वाची जागतिक समीकरणे

  • १. अमेरिका-इराण युद्ध पेटले: मध्यपूर्वेतील समुद्रात इराणकडून झालेले क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले अमेरिकेने यशस्वीपणे हाणून पाडल्याचा दावा केला आहे. तसेच अमेरिकेने इराणच्या ‘केश्म’ बेटावर प्रत्युत्तरादाखल मोठे हवाई हल्ले केले आहेत. या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव कमालीचा वाढला आहे.
  • २. कच्च्या तेलाच्या किमतीत भडका: युद्धामुळे पुरवठ्यात व्यत्यय येण्याच्या भीतीने कच्च्या तेलाचे भाव पुन्हा कडाडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘ब्रेंट क्रूड’चा भाव १.१३ टक्क्यांनी वधारून ९७.०८ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे, तर ‘डब्ल्यूटीआय क्रूड’चा भाव १.२४ टक्क्यांनी वाढून ९४.९२ डॉलर झाला आहे. भारतासारख्या आयातदार देशासाठी ही चिंतेची बाब आहे.
  • ३. वॉल स्ट्रीटवर संमिश्र व्यवहार: अमेरिकन शेअर बाजारात मंगळवारी किरकोळ वाढ पाहायला मिळाली. डाऊ जोन्स ०.४५ टक्क्यांनी वधारला, तर नॅसडॅक आणि एसअँडपी ५०० निर्देशांक सपाट बंद झाले. तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘अॅपल’ आणि ‘मार्व्हेल टेक’चे शेअर्स वधारले, तर ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि ‘अल्फाबेट’च्या शेअरमध्ये ४ टक्क्यांपर्यंत मोठी घसरण झाली.
  • ४. अमेरिकेत नोकऱ्यांचा महापूर: अमेरिकेतील ‘जॉल्ट्स’ अहवालानुसार, एप्रिल महिन्यात तब्बल ७.६१ दशलक्ष नोकऱ्यांच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत, ज्या गेल्या ५ वर्षांतील सर्वाधिक आहेत.
  • ५. सोने-चांदी घसरले: अमेरिकेतील मजबूत रोजगार आकडेवारीमुळे अमेरिकन केंद्रीय बँक ‘फेडरल रिझर्व्ह’ व्याजाचे दर प्रदीर्घ काळासाठी चढेच ठेवणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर ०.४ टक्क्यांनी घसरून ४,४६९.१३ डॉलर प्रति औसांवर आले, तर चांदीचे दर ०.९ टक्क्यांनी घसरले.
  • ६. डॉलर मजबूत, येन दबावाखाली: जागतिक बाजारात डॉलर निर्देशांक ९९.२१ वर मजबूत स्थितीत राहिला. दुसरीकडे, जपानी चलन ‘येन’ कमजोर होऊन प्रति डॉलर १६० च्या पातळीच्या अगदी जवळ पोहोचले आहे.
  • ७. जपानचा ‘निक्केई’ विक्रमी पातळीवर: आशियाई बाजारात संमिश्र वातावरण असताना जपानच्या ‘निक्केई’ (Nikkei) निर्देशांकाने मात्र रात्रीतून मोठी रॅली करत ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.

आरबीआयच्या पतधोरणावर बाजाराची नजर

“परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FII) सुरू असलेली सातत्यपूर्ण विक्री आणि जागतिक पातळीवरील अनिश्चितता यामुळे आगामी काळात निफ्टी ५० एका मर्यादित पट्ट्यात हेलकावे खाण्याची शक्यता आहे. बाजाराचे संपूर्ण लक्ष आता ‘रिझर्व्ह बँके’च्या आगामी पतधोरण बैठकीच्या निर्णयाकडे लागले आहे. त्यामुळे व्याजदराशी संबधित बँक, ऑटो आणि रिअल्टी क्षेत्रात मोठी हालचाल पाहायला मिळू शकते.” – सिद्धार्थ खेमका (संशोधन प्रमुख, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस).

ठळक मुद्दे

  • दबावाखाली सुरुवात : गिफ्ट निफ्टी १३४ अंशांनी घसरल्याने सेन्सेक्स-निफ्टीची सुरुवात मंदीत होण्याचे संकेत.
  • क्रूड ९७ डॉलर पार : अमेरिका-इराण थेट युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा भडका.
  • अमेरिकन व्याजदर कपात लांबणार : मजबूत रोजगार आकडेवारीमुळे सोने घसरले; डॉलर इंडेक्स ९९ च्या पार.
  • आरबीआय पतधोरण महत्त्वाचे : बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांचे रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेकडे लक्ष.