Shashi Kumar Akshayakalpa Success Story : भारतात सर्वात कठीण व्यवसाय शेती समजला जातो. कारण, तो पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. एखादा अवकाळी पाऊस तुमच्या वर्षभराची मेहनत पाण्यात घालू शकतो. यामुळे बहुतेक शेतकऱ्यांची मुलं आता शेतीपेक्षा नोकरी आणि इतर व्यवसाय करण्याकडे वळत आहे. अशावेळी आयटी क्षेत्रातील मोठा पगार आणि ग्लॅमसर कार्पोरेट आयुष्य सोडून जर कोणी शेती करण्याचा विचार मांडला तर त्याला वेड्यात काढलं जाण्याची शक्यता जास्त आहे. पण, शशी कुमार यांनी हाच मोठा जुगार खेळला. ‘विप्रो’सारख्या बलाढ्य कंपनीतील १२ वर्षांची लीड आर्किटेक्टची नोकरी, भक्कम पगार आणि सुरक्षित भविष्य सोडत त्यांनी शेती व्यवसायात पाऊल ठेवले. १० वेळा दिवाळखोरीच्या वाटेवर असलेल्या शशी यांनी जिथं हरवलं तिथेच आता ६०० कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे.
शेती करायचं ठरवलं म्हणून वडील ८ वर्षे बोलले नाही
बंगळुरू विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शशी कुमार यांनी अमेरिकेतील ‘इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ तंत्रज्ञान, शिकागो’ येथेून पुढील शिक्षण घेतलं. १९९१ मध्ये कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी आपल्या पारंपरिक जमिनीवर नैसर्गिक शेती करण्याचा विचार वडिलांसमोर मांडला होता. पण स्वतः आयुष्यभर शेती अनुभवलेल्या वडिलांनी त्यांना आयटी क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला दिला. दोन दशकं आयटी क्षेत्रात काम केल्यानंतरही शशी यांच्या मनातून शेती कधीच केली नाही. २०१० मध्ये जेव्हा शशी कुमार यांनी विप्रो सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्या वडिलांनी तीव्र विरोध केला. या निर्णयामुळे त्यांचे वडील तब्बल ८ वर्षे त्यांच्याशी बोलले नाहीत.
शेती म्हणायला सोपी पण करायला कठीण
संगणक सोडून हातात फावडे घेतलेल्या शशी यांनी शेती कसायला लागल्यानंतर यातील आव्हाने समजू लागली. त्यांनी शेतीपुरक व्यवसायात प्रवेश केला. शशी कुमार यांनी ‘अक्षयकल्प’ नावाची कंपनी स्थापन केली. सुरुवातीच्या काळात कंपनी तब्बल १० वेळा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. अशा कठीण प्रसंगी त्यांच्या पत्नी शिल्पा जी. यांनी आपल्या बचतीतून ३० लाख रुपये आणि काका डॉ. मुनी रेड्डी यांनी १० लाख रुपये गुंतवून कंपनीला नवीन जीवनदान दिले.
‘अक्षय कल्प’ काय करते?
‘अक्षय कल्प’ कंपनी सेंद्रिय दुग्ध व्यवसाय, मधमाशी पालन, कुक्कुटपालन व जैविक खत निर्मितीची उत्पादन करते. या कंपनीशी २,८०० गावांमधील सुमारे २,८०० शेतकरी जोडलेले आहेत. विशेष म्हणजे यात तरुण शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. १,२०० महिला शेतकरी असून शेतकऱ्यांचे सरासरी वय ३२ वर्षे आहे. शशी हे केवळ स्वतः नफा कमावत नसून शेतकऱ्यांनाही रोजगार उपलब्ध करुन देत आहे. या शेतकऱ्यांचे दरमहा उत्पन्न १.२८ लाख रुपये आहे. बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि पुण्यातील बाजारपेठांमध्ये या कंपनीचे उत्पादन तुम्हाला पाहायला मिळतील. कंपनीचा वार्षिक उलाढाल ६०० कोटींच्या पुढे गेली आहे.
दुग्ध व्यवसायातून रोजचा रोकड प्रवाह
दुग्ध व्यवसायाची निवड करण्यामागे शशी कुमार यांचा मुख्य उद्देश होता की शेतकऱ्यांच्या हातात दरमहा निश्चित पैसे जावेत. जेणेकरुन त्यांना कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही. यानंतर त्यांनी जमीन व्यवस्थापन, केळीची बाग आणि सेंद्रिय खत निर्मिती यांसारख्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट-तिप्पट केले. आज ‘अक्षय कल्प’ने हे सिद्ध केले आहे की, योग्य तंत्रज्ञान आणि व्यावसायिक दृष्टिकोन जोडल्यास शेती हे तरुण पिढीसाठी अत्यंत फायदेशीर आणि सन्मानजनक करिअर ठरू शकते.
