मुंबई: पाच लाख तोफगोळ्यांची वार्षिक निर्मिती क्षमता असलेले आणि सुमारे एक हजार कोटींची गुंतवणूक असलेले संरक्षण उत्पादन संकुल शिर्डी येथे साकारण्यात आले असून, ते राज्यातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्राला आणि रोजगाराला चालना देणारे हे जगातील तिसरे सर्वात मोठे उत्पादन केंद्र ठरेल, असा सरकारचा दावा आहे.
निबे या खासगी समूहातर्फे सुमारे २०० एकर क्षेत्रात अहिल्यानगरमधील शिर्डी येथे उभारण्यात येणाऱ्या या संकुलाचे उद्घाटन २३ मे रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संरक्षण दल प्रमुख अनिल चौहान आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत केले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाचा भाग म्हणून शिर्डीला देशातील प्रमुख संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यात येत आहे. हे संकुल भारतातील खासगी क्षेत्रातील संरक्षण उत्पादनाला चालना देणारे ठरेल. संरक्षण उत्पादनात भारताला आत्मनिर्भर बनविण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती त्यातून होईल, असा विश्वास विखे-पाटील यांनी या प्रकल्पाची माहिती देताना व्यक्त केला.
सुरुवातीला या प्रकल्पात एक हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून यामुळे सुमारे दोन हजारांना रोजगार मिळेल. तसेच या परिसरातील सुमारे १०० सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना चालना मिळेल, असा निबे समूहाचे गणेश निबे यांनी दावा केला. हा प्रकल्प महत्त्वाच्या संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रांमधील प्रगत उत्पादनाला चालना देईल.
तसेच स्वदेशी तंत्रज्ञान आणि सामरिक उत्पादनातील भारताच्या वाढत्या क्षमतांना तो बळकटी देईल, असे निबे म्हणाले.संकुलाची क्षमता वार्षिक पाच लाख तोफगोळे निर्मितीची आहे. या शिवाय ड्रोन, स्फोटके, रॉकेट लॉन्चर्सची निर्मिती या ठिकाणी होईल. स्फोटकांकरिता लागणाऱ्या साहित्याची निर्मितीही पूर्णपणे स्वदेशी आहे.
कंपनीचा भर या उत्पादनांच्या निर्यातीवरही आणि एकूण उत्पादनाच्या निर्यातीचा वाटा ७० टक्के असेल, असे निबे यांनी सांगितले. यावेळी बायो-सीएनजी गॅस प्रकल्पाचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची निर्मिती क्षमता प्रति दिन सुमारे एक लाख सिलिंडर इतकी असेल. प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने २३ आणि २४ मे रोजी आयोजिण्यात येणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थी, अभियंते, युवा नवोन्मेषक, संरक्षण क्षेत्रातील अधिकारी, उद्योजक, गुंतवणूकदार सहभागी होतील.
