Shravan Kumar Vishwakarma Shankh Air Story: नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने नुकतीच देशातील तीन नव्या विमान सेवा कंपन्यांना परवानगी दिली आहे. परवानगी मिळालेल्या या तीन विमान सेवा कंपन्यांमध्ये शंख एअरचाही समावेश आहे. शंख एअरची ही यशोगाथा देशातील अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेल्या श्रवण कुमार विश्वकर्मा यांनी स्थापन केलेली ही विमान कंपनी एका विलक्षण प्रवासाचे प्रतीक आहे.

३५ वर्षीय विश्वकर्मा सात वर्षांपूर्वी कानपूरच्या रस्त्यांवर लोडर आणि टेम्पो चालक म्हणून काम करत होते. दृढनिश्चय आणि स्टील, सिमेंट तसेच वाहतूक क्षेत्रातील फायदेशीर व्यवसायांच्या जोरावर त्यांनी उत्तर प्रदेशातील पहिली स्थानिक विमान कंपनी सुरू करण्याचे बालपणीचे स्वप्न पूर्ण केले.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाल्यानंतर आता २०२६ च्या सुरुवातीला शंख एअर आपले कामकाज सुरू करेल, अशी अपेक्षा आहे. ही विमान कंपनी जानेवारीच्या पहिल्या सहामाहीत तीन एअरबस विमानांच्या ताफ्यासह सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. ही कंपनी प्रामुख्याने लखनऊहून दिल्ली, मुंबई आणि इतर महानगरांमध्ये प्रवासी सेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे, असे अध्यक्ष श्रवण कुमार विश्वकर्मा यांनी सांगितले आहे.

जागरणच्या वृत्तानुसार, विश्वकर्मा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणी त्यांना अभ्यासात फारसा रस नव्हता. त्यांनी केवळ टेम्पोमधून प्रवासच केला नाही, तर उपजिविकेसाठी ते स्वतः चालवलेही आहेत. “तळागाळातून वर आलेला माणूस सायकल, बस, ट्रेन आणि टेम्पो असे सर्व काही पाहतो”, असे ते म्हणाले.

“मी ऑटो रिक्षा चालवल्या आणि काही छोटे व्यवसाय करून पाहिले, त्यापैकी बरेचसे अयशस्वी ठरले”, असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की २०१४ मध्ये सिमेंट व्यवसायात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला खऱ्या अर्थाने गती मिळाली.

व्यवसाय जगतात पाऊल ठेवल्यानंतर त्यांनी हळूहळू स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांना पहिले मोठे यश टीएमटी रिबार उद्योगात मिळाले. त्या यशाच्या जोरावर त्यांनी सिमेंट, खाणकाम आणि वाहतूक क्षेत्रात आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. ट्रकचा मोठा ताफा उभारून त्यांनी आपली व्यावसायिक ओळख पक्की केली आणि शंख एअरचा पाया घातला.

कशी झाली शंख एअरची सुरुवात?

शंख एअरच्या स्थापनेबाबत बोलताना विश्वकर्मा म्हणाले की, विमान वाहतूक क्षेत्रात प्रवेश करण्याची कल्पना त्यांना सुमारे चार वर्षांपूर्वी सुचली.

“ही कल्पना मनात आल्यावर मी एनओसी कशी मिळवायची, नियम काय आहेत आणि ही प्रणाली कशी चालते ही संपूर्ण प्रक्रिया समजून घ्यायला सुरुवात केली. चार वर्षांपूर्वी एक कल्पना म्हणून सुरू झालेली गोष्ट आता प्रत्यक्षात उतरली आहे”, असे त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

मोठे स्वप्न पाहणे पाप मानले जात होते

सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाची पार्श्वभूमी आसलेले विश्वकर्मा म्हणाले की, मोठे स्वप्न पाहणे हे एकेकाळी पाप मानले जात होते. “ज्या परिस्थितीत आम्ही वाढलो, त्यात फक्त उपजीविका कमावणे पुरेसे मानले जात असे. त्यापलीकडे स्वप्न पाहणे पाप मानले जायचे”, असे ते म्हणाले.

“विमान हे बस किंवा टेम्पोसारखेच वाहतुकीचे एक साधन आहे. त्याकडे काहीतरी विशेष गोष्ट म्हणून पाहू नये”, असेही त्यांनी नमूद केले.