Shubman Gill Mumbai House Juhu purchase details compared to Rohit Sharma and Suryakumar Yadav: गेल्या वर्षभरापासून भारतीय क्रिकेटपटूंचा मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रात रस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी माजी कर्णधार रोहित शर्मा, टी २० विश्वविजेता कर्णधार सूर्यकुमार यादव आणि माजी गोलंदाज जहीर खान यांच्यानंतर आता एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलने मुंबईतील जुहू परिसरात सुमारे २० कोटी रुपयांचा अपार्टंमेंट खरेदी केला आहे.

रिअल इस्टेट डेटा ॲनालिटिक्स प्लॅटफॉर्म झॅपकीला प्राप्त झालेल्या व्यवहार आणि नोंदणी कागदपत्रांनुसार, क्रिकेटपटू शुभमन गिल याने मुंबईतील जुहू येथे ३,३६९ चौरस फूट क्षेत्रफळाचा, सध्या बांधकामाधीन असलेला एक आलिशान अपार्टमेंट २०.७ कोटी रुपयांना खरेदी केला आहे. हा अपार्टमेंट जुहू-तारा रोडवरील, आगामी ‘पूजा ल्युमिनेअर’ प्रकल्पाच्या १२ व्या मजल्यावर आहे.

भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघांचा सध्याचा कर्णधार असलेल्या गिलने या व्यवहारासाठी १.२४ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क (Stamp Duty) भरले आहे. या खरेदीसाठीचा प्रभावी दर प्रति चौरस फूट ६१,४४२ रुपये इतका असून, तो या परिसरातील इतर आगामी प्रकल्पांच्या दरांशी मिळताजुळता आहे. जुहू हा परिसर मुंबईतील अतिश्रीमंत व्यक्तींसाठी एक अत्यंत पसंतीचे आणि प्रतिष्ठित असे आलिशान निवासी ठिकाण मानला जातो. ज्यामध्ये उद्योग, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे.

गिलने हा अपार्टमेंट ‘पूजा लेझर अँड लाइफस्टाइल’ या रिअल इस्टेट कंपनीकडून खरेदी केला आहे. या कंपनीचे प्रवर्तक चित्रपट निर्माते आणि विकासक वाशू भगनानी, त्यांची पत्नी पूजा, तसेच त्यांचा मुलगा जॅकी भगनानी हे आहेत. या कंपनीने डिसेंबर २०२४ मध्ये १६ मजली ‘लुमिनेअर’ (Luminaire) प्रकल्प सुरू केला असून, तो २०२९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जहीर खान यांची गुंतवणूक

अलिक मुंबईच्या रिअल इस्टेट बाजारपेठेत गुंतवणूक करणाऱ्या इतर क्रिकेटपटूंमध्ये आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये रोहित शर्मा, झहीर खान आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे.

रोहित शर्मा

क्रिकेटपटू रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने काही महिन्यांपूर्वी मुंबईतील प्रभादेवी परिसरात २६.३० कोटी रुपयांना एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. आहुजा टॉवर्समध्ये असलेल्या या फ्लॅटचे क्षेत्रफळ सुमारे २,७६० चौरस फूट आहे आणि त्यात तीन कार पार्किंग स्पेस आहेत. मालमत्ता नोंदणी कागदपत्रांवरून असे दिसून येते की या व्यवहारावर सुमारे १.३१ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी आकारली गेली होती आणि १२ डिसेंबर २०२५ रोजी त्याची नोंदणी झाली होती.

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा यादवने गेल्या महिन्यात मुंबईतील देवनार परिसरात ७.१८ कोटी रुपयांचा एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. गोदरेज स्काय टेरेसेस प्रकल्पात असलेला हा फ्लॅट सुमारे १,५०० चौरस फूट क्षेत्रफळाचा आहे आणि मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार २० फेब्रुवारी २०२६ रोजी त्याची नोंदणी झाली आहे.

सीआरई मॅट्रिक्सने पाहिलेल्या कागदपत्रांनुसार, ही खरेदी याच प्रकल्पातील या जोडप्याचा तिसरा फ्लॅट आहे, ज्यामुळे शहरातील त्यांचा रिअल इस्टेट पोर्टफोलिओ आणखी मजबूत झाला आहे.

मार्च २०२५ मध्ये देविशा यादवने त्याच इमारतीत १७ व्या आणि १८ व्या मजल्यावर आणखी दोन फ्लॅट २१ कोटींपेक्षा जास्त किमतीत खरेदी केले असल्याचे कागदपत्रांमधून समोर आले होते.

झहीर खान

सध्याच्या खेळाडूंसह माजी क्रिकेटपटू देखील मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने अभिनेत्री सागरिका घाटगेसह कुटुंबातील सदस्यांसह एल्फिन्स्टन रोडवरील इंडियाबुल्स स्काय इमारतीत सुमारे ११ कोटी रुपयांना एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे.