लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई :  कर्नाटकमध्ये झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडींनंतर त्याचे थेट पडसाद आता शेअर बाजारात पाहायला मिळत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर, प्रसिद्ध कॅफे साखळी ‘कॅफे कॉफी डे’ चालवणाऱ्या ‘कॉफी डे एंटरप्रायझेस’च्या शेअरने थेट २० टक्क्यांचे अप्पर सर्किट गाठले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि राज्यात नव्या नेतृत्वाचा मार्ग मोकळा झाला आहे. कंपनीचा शेअर तब्बल २० टक्क्यांच्या अपर सर्किटसह ३४.७८ रुपयांवर पोहोचला.

काँग्रेस नेतृत्वाच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हे कर्नाटकच्या पुढील मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारू शकतात, अशा वृत्तांनंतर बाजारात या शेअरकडे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले.

डीके शिवकुमार यांचा ‘कॅफे कॉफी डे’ कुटुंबाशी संबंध

डी.के. शिवकुमार यांचे ‘कॅफे कॉफी डे’चे संस्थापक दिवंगत व्ही.जी. सिद्धार्थ यांच्या कुटुंबाशी वैवाहिक नाते आहे. शिवकुमार यांची ज्येष्ठ कन्या ऐश्वर्या हिचा विवाह कॉफी डेचे दिवंगत संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांचे सुपुत्र अमर्त्य हेगडे यांच्याशी झाला आहे. कर्नाटकात सत्ता बदल होऊन शिवकुमार यांच्या हाती राज्याची सूत्रे जाण्याची शक्यता निर्माण होताच, गुंतवणूकदारांनी या कौटुंबिक संबंधांचा फायदा कंपनीला होऊ शकतो या अपेक्षेने शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली. संभाव्य राजकीय बदल आणि सीसीडी समूहाशी असलेले कौटुंबिक संबंध यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची चर्चा रंगली. कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाल्यापासून सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदाची रोटेशन पद्धती लागू होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता सिद्धरामय्या यांनी पदत्याग केल्याने त्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.

दिल्लीत खलबते: नव्या मंत्रिमंडळाची तयारी

दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर सिद्धरामय्या हे डी.के. शिवकुमार आणि कर्नाटक काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांच्यासह दिल्लीत दाखल झाले आहेत. तिथे त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. आज संध्याकाळी ते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही भेट घेणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत नवीन सरकारच्या स्थापनेबाबत, राज्यसभा उमेदवार, विधान परिषदेच्या जागा आणि संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा सुरू आहे. नवीन शिवकुमार सरकारमध्ये जुन्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता असून, प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधण्यासाठी चार नवीन उपमुख्यमंत्री नियुक्त करण्यावर विचार सुरू आहे.

‘कॅफे कॉफी डे’ला आर्थिक दिलासा

केवळ राजकीय घडामोडीच नव्हे, तर कंपनीच्या मजबूत आर्थिक कामगिरीनेही या तेजीला बळ दिले आहे. कॉफी डे एंटरप्रायझेसने मार्च २०२६ ला संपलेल्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले असून कंपनीने १३२.०७ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला  ११४.१६ कोटी रुपयांचा  मोठा तोटा झाला होता. त्यामुळे तोट्यातून बाहेर पडत कंपनीने केलेली ही कामगिरी आणि कर्नाटकातील राजकीय वातावरण, या दोन्ही गोष्टी सध्या कॉफी डेच्या पथ्यावर पडताना दिसत आहेत. कंपनीच्या आर्थिक सुधारणांसोबतच राजकीय घडामोडींमुळेही कॉफी डेच्या शेअरमध्ये मोठी खरेदी पाहायला मिळाल्याचे बाजार विश्लेषकांचे मत आहे.

कॅफे कॉफी डे आउटलेट्स चालवणाऱ्या ‘कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेड’चा (Coffee Day Enterprises Ltd.) चालू बाजारभाव सध्या शेअर बाजारात मोठी झेप घेत  ३४.७८ वर पोहोचला आहे. या तेजीमुळे कंपनीच्या बाजार मूल्यालाही चांगला बूस्ट मिळाला असून, कॉफी डेचे एकूण बाजारभांडवल वाढून सुमारे ७३४.७३ कोटी झाले आहे. हा शेअर स्मॉल-कॅप श्रेणीमध्ये मोडत असून, मागील ५२ आठवड्यांचा विचार करता या शेअरने २१ रुपयांचा नीचांक आणि ५१.४६ रुपयांचा उच्चांक गाठला आहे.