मुंबई: नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘स्पेशलाईज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्स’ना (एसआयएफ) गुंतवणूकदारांकडून पसंती मिळत असून फेब्रुवारीमध्ये या श्रेणीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेने (एयूएम) १३,८१४ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. समभाग (इक्विटी), निश्चित उत्पन्न आणि हायब्रिड या विभागांमध्ये उद्दिष्ट-केंद्रित आणि सक्रियपणे व्यवस्थापित गुंतवणूक धोरण राबविण्यासाठी हे खास व्यासपीठ तयार करण्यात आले आहे.
‘एसआयएफ’ हे सेबीने सुरू केलेले एक नवीन श्रेणीतील उत्पादन आहे, जे पारंपारिक म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांच्यात मध्य साधणारे उत्पादन आहे. या योजनेत किमान १० लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक ठरते. अधिक परिणामाभिमुख पोर्टफोलिओ शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी लवचिक व सानुकूल उपाय मिळवून देण्यात ‘एसआयएफ’ची विशेष भूमिका आहे.
गेल्या वर्षी ‘स्पेशलाईज्ड इन्व्हेस्टमेंट फंड’साठी नियामक आराखडा आणला गेला. ३१ मे २०२४ पर्यंत, एसआयएफने ५६,००० हून अधिक गुंतवणूकदार खात्यांद्वारे (फोलिओद्वारे) १३,५०० कोटी रुपयांहून अधिक निव्वळ मालमत्ता जमा केली आहे, असे ‘ॲसोचॅम’च्या १७ व्या म्युच्युअल फंड परिषदेत बोलताना ‘सेबी’चे पूर्णवेळ सदस्य अमरजीत सिंग म्हणाले. २१ गुंतवणूक रणनीतींपैकी ‘हायब्रिड लॉन्ग-शॉर्ट’ रणनीती अंतर्गत सर्वाधिक निधी जमा केला गेला आहे.
वितरण व्यवस्था बळकट करण्यासाठी, ‘सेबी’ आणि ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स’ (एनआयसएम) वितरकांसाठी एका सामायिक प्रमाणपत्रावर काम करत असल्याचे सिंग यांनी सांगितले. म्युच्युअल फंड उद्योग हा देशाच्या आर्थिक बाजारपेठेतील एक महत्त्वपूर्ण घटक आहे, कारण तो कुटुंबांना पारदर्शकपणे आणि कमी खर्चात दीर्घकालीन संपत्ती निर्मिती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देतो. याव्यतिरिक्त, हा उद्योग विकासासाठी स्थिर आणि देशांतर्गत भांडवल उपलब्ध करून देतो, तसेच सूचिबद्ध कंपन्यांमधील महत्त्वाचा भागधारक म्हणून जबाबदार व्यवस्थापनाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो, असेही सिंग म्हणाले.
