Rich Dad Poor Dad Author Silver Outlook: ‘रिच डॅड पुअर डॅड’ या पुस्तकाचे लेखक आणि अमेरिकन व्यावसायिक रॉबर्ट कियोसाकी यांनी शुक्रवारी केलेल्या एका एक्स पोस्टमध्ये ‘चांदी खरेदी करण्यासाठी आता खूप उशीर झाला आहे का?’ या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी हेही स्पष्ट केले आहे की त्यांनी १९६५ मध्ये चांदी खरेदी करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी चांदीची किंमत प्रति औंस एक डॉलरपेक्षा कमी होती.

या आठवड्याच्या सुरुवातीला २३ डिसेंबर रोजी युरोपीय बाजारात चांदीची किंमत इतिहासात प्रथमच प्रति औंस ७० डॉलरच्या पुढे गेली आहे. चांदीच्या या ऐतिहासिक उच्चांकानंतर रॉबर्ट कियोसाकी यांनी पहिल्यांदाच चांदीच्या तेजीवर आणि त्यातील गुंतवणुकीवर भाष्य केले आहे.

…तर तुम्हाला उशीर झाला आहे

एक्सवरील पोस्टमध्ये कियोसाकी यांनी, “चांदी खरेदी करण्यासाठी आता खूप उशीर झाला आहे का?” असा प्रश्न उपस्थित करत त्याचे उत्तरही दिले आहे.

“चांदी खरेदी करण्यासाठी उशीर झाला आहे की नाही, हे परिस्थितीवर अवलंबून आहे. जर तुम्हाला वाटत असेल की चांदी सध्या विक्रमी उच्चांकावर आहे, तर तुम्हाला उशीर झाला आहे. माझ्या मते चांदीतील खरी तेजी आता सुरू होत आहे आणि माझा विश्वास आहे की २०२६ मध्ये चांदीची किंमत ७० ते २०० डॉलरपर्यंत पोहोचणे शक्य आहे”, असे रॉबर्ट कियोसाकी आपल्या उत्तरात म्हणाले.

माझा सल्ला आहे की तुम्ही यूट्यूबवर…

भविष्यातील चांदीच्या किमतींबाबत त्यांनी अशी टिप्पणी केली की, “चांदीची किंमत २०० डॉलरपर्यंत पोहोचणे शक्य आहे असे म्हणण्यामागे अनेक कारणे आहेत. माझा सल्ला आहे की तुम्ही यूट्यूबवर माहिती शोधा, तज्ज्ञांकडून याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या आणि मग स्वतः निर्णय घ्या. मी १९६५ मध्ये चांदी खरेदी करायला सुरुवात केली होती. तेव्हा चांदीची किंमत प्रति औंस एक डॉलरपेक्षा कमी होती. मी आजही ७० डॉलर प्रति औंस दराने चांदी खरेदी करत आहे.”

श्रीमंत होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे…

“श्रीमंत होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतः संशोधन करणे हाच आहे. छोट्या छोट्या गुंतवणुकीतून सुरुवात करा. जरी तुम्ही चुका केल्या तरी, तुम्ही अशा व्यक्तीपेक्षा अधिक श्रीमंत व्हाल जो फक्त इतरांना काय करायचे याचे सल्ले देतो. जेव्हा तुम्ही अभ्यास करता, तुमच्या चुकांमधून, तुमच्या यश आणि अपयशातून शिकता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंत व्यक्ती व्हाल”, असे कियोसाकी पोस्टच्या शेवटी म्हणाले.