Silver Price Crash: आज (गुरुवार, २ एप्रिल) चांदीच्या दरात जवळपास ६ टक्क्यांची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणातून मध्य-पूर्वेतील युद्धाची तीव्रता कमी होण्याबाबत कोणतीही ठोस ग्वाही न मिळाल्याने, मौल्यवान धातूंच्या बाजारातील गुंतवणूकदारांचा उत्साह मावळला.

अमेरिका इराणमधील आपली लष्करी मोहीम पुढील काही आठवडे सुरूच ठेवणार असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. यावरून, भू-राजकीय तणाव आणखी काही काळ उच्च पातळीवरच कायम राहण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळाले. त्यांच्या या विधानामुळे कमोडिटी आणि वित्तीय बाजारांमध्ये मोठी उलथापालथ झाली. हा संघर्ष दीर्घकाळ चालण्याची शक्यता लक्षात घेऊन गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मकता पसरली आहे.

चांदी १३ हजार रुपयांनी घसरली

एमसीएक्सवर, चांदीचा भाव ५.६ टक्क्यांनी (किंवा १३,६१३ रुपयांनी) घसरून २,२९,८८८ रुपये प्रति किलो झाला, तर सोन्याचा भाव १.६५ टक्क्यांनी (किंवा २,५४७ रुपयांनी) कमी होऊन १,५१,१६१ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचला आहे.

सोने आणि चांदीसह इतर मौल्यवान धातूंवरही दबाव आला. प्लॅटिनम १.८ टक्क्यांनी घसरून १,९२८.२६ डॉलरवर आले, तर पॅलेडियम १.४ टक्क्यांनी कमी होऊन १,४५१.८५ डॉलरवर पोहोचले.

आंतरराष्ट्रीय बाजारात काय परिस्थिती?

आंतरराष्ट्रीय बाजारात, स्पॉट चांदीचे दर २.९ टक्क्यांनी घसरून ७२.९५ डॉलरवर आले. सोन्याच्या व्यवहारातही नरमी दिसून आली. स्पॉट सोन्याचे दर १.३ टक्क्यांनी कमी होऊन ४,६९४.४८ डॉलर प्रति औंस झाले, तर अमेरिकन सोन्याचे वायदा दर (Futures) १.९ टक्क्यांनी घसरून ४,७२३.७० डॉलरवर पोहोचले. दिवसाच्या सुरुवातीला सोन्याच्या किमती १ टक्क्यांहून अधिक वाढल्या होत्या आणि त्यांनी १९ मार्चनंतरची आपली सर्वोच्च पातळी गाठली होती. मात्र, ट्रम्प यांच्या भाषणानंतर या किमतींमध्ये पुन्हा घसरण सुरू झाली.

ट्रम्प यांच्या भाषणामुळे तेल, डॉलर आणि बॉण्ड यील्डमध्ये वाढ

आपल्या आजच्या भाषणात, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की अमेरिका पुढील दोन ते तीन आठवड्यांत इराणवर “अत्यंत कठोर” हल्ला करेल आणि त्यांना “अश्मयुगात” ढकलून देईल. ते असेही म्हणाले की या संघर्षातील अमेरिकेची सामरिक उद्दिष्ट्ये पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत, तरीही या भाषणातून युद्ध तात्काळ संपुष्टात येण्याचे फारसे संकेत मिळाले नाहीत.

या भाषणानंतर, ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती ४% पेक्षा जास्त वाढल्या, तर १०-वर्षीय यू.एस. ट्रेझरी यील्ड आणि डॉलर निर्देशांकही वधारले. मजबूत डॉलर आणि वाढत्या बॉण्ड यील्डमुळे डॉलर आधारित मौल्यवान धातूंवर दबाव आला, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे आकर्षक कमी झाले.

भू-राजकीय अस्थिरता आणि महागाईच्या काळात सोने आणि चांदीला अनेकदा सुरक्षित गुंतवणूक मानले जात असले तरी, वाढलेले व्याजदर उत्पन्न न देणाऱ्या मालमत्ता बाळगण्याची संधीची किंमत वाढवून सोन्या-चांदीच्या किमतीतील वाढीवर मर्यादा घालतात.