SIP vs Bank RD Investment : श्रीमंत व्हायचं असेल तर केवळ उत्पन्न वाढवून उपयोग नाही. तुम्ही कुठे आणि कशी गुंतवणूक करता? हे फार महत्त्वाचं आहे. दरमहा केवळ २,००० रुपयांची बचत करून दीर्घकाळात मोठा निधी उभारणे शक्य आहे. मात्र, ही बचत नेमकी कुठे गुंतवावी? बँक एफडी, आरडी की म्युच्युअल फंड एसआयपी? या तिन्ही पर्यायांची गुंतवणूक पद्धत आणि त्यातून मिळणारा परतावा भिन्न आहे. याचं उत्तर तुमचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट काय आहे? यावर अवलंबून आहे.

बँक बचत ठेव

शेअर बाजारातील जोखीम पत्करायची नसेल आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय हवा असेल तर बँक एफडी आणि आरडी हे सुरक्षित आणि निश्चित परताव्यासाठी ओळखले जातात. विशेष म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक तुमच्या ५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीला संरक्षण देणे. म्हणजे उद्या बँक बुडाली तरी तुमची ५ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक सुरक्षित राहील. ही सुरक्षा केवळ सरकारी आणि सार्वजनिक बँकांसाठीच आहे. परताव्याचा विचार केला तर १० वर्षांसाठी दरमहा २००० रुपये आरडीमध्ये टाकले तर तुमची गुंतवणूक २ लाख ४० हजार रुपये होईल. यावर मिळणारा परतावा ३ लाख ३७ हजार ९७८ रुपये होईल.

म्युच्युअल फंडात एसआयपी

तुमचे उद्दिष्ट १० वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी असेल तर म्युच्युअल फंडातील एसआयपी हा उत्तम पर्याय आहे. या पर्यायात शेअर बाजारातील जोखीम आहे, पण दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये ही धोका बऱ्यापैकी कमी होतो. परताव्याचा विचार केला तर हा पर्याय इतर कोणत्याही पर्यायांमध्ये सर्वात मोठा फंड उभा करणारा आहे. समजा तुम्ही म्युच्युअल फंडात १० वर्षांसाठी २,००० रुपयांची एसआयपी केली तर तुमची गुंतवणूक २ लाख ४०,००० रुपये होईल. यावर सरासरी १२ टक्के परतावा गृहीत धरला तर तुम्हाला १० वर्षानंतर ४ लाख ४८ हजार ०७२ रुपये मिळतील.

कोणता पर्याय योग्य ठरले?

  • ज्यांना बाजारातील चढ-उतारांची भीती वाटते आणि निश्चित परतावा हवा आहे, त्यांच्यासाठी बँक आरडी (RD) किंवा एफडी (FD) हा उत्तम मार्ग आहे.
  • जर तुम्ही दीर्घकाळासाठी (१०-१२ वर्षे) गुंतवणूक करत असाल आणि बाजारातील थोडी जोखीम पत्करण्याची तयारी असेल, तर एसआयपी (SIP) मधील परतावा इतर पर्यायांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असू शकतो.
  • जर तुम्ही तरुण गुंतवणूकदार असाल तर चांगल्या परताव्यासाठी थोडी जोखीम घेऊ शकता. पण, जर निवृत्त किंवा वयस्क असाल तर सुरक्षित गुंतवणूक पर्याय केंव्हाही चांगलाच.