नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील दिग्गज तंत्रज्ञान गुंतवणूकदार कंपनी ‘सॉफ्टबँक ग्रुप’ने आघाडीची आयवेअर कंपनी ‘लेन्सकार्ट सोल्यूशन्स’मधील आपली ३.२५ टक्के हिस्सेदारी खुल्या बाजारात विकली आहे. हा व्यवहार तब्बल २,८७३ कोटी रुपयांना पार पडल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रीय शेअर बाजारावरील ब्लॉक डीलच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, सॉफ्टबँकने आपल्या ‘SVF II लाइटबल्ब (केमन) लिमिटेड’ या उपकंपनीच्या माध्यमातून लेन्सकार्टचे ५ कोटी ६५ लाख शेअर्स विकले आहेत. सरासरी ५०८.५५ रुपये प्रति शेअर या दराने विकले गेले, ज्यामुळे एकूण व्यवहाराचे मूल्य २,८७३.३० कोटी रुपयांवर पोहोचले. या मोठ्या व्यवहारानंतर लेन्सकार्टमधील सॉफ्टबँकची एकूण हिस्सेदारी १३.१३ टक्क्यांवरून घसरून आता ९.८८ टक्क्यांवर आली आहे.

खरेदीदारांची रीघ : म्युच्युअल फंड कंपन्या आणि परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी या शेअर खरेदीत मोठा रस दाखवला. यामध्ये प्रामुख्याने कोटक MF, मिराई अॅसेट MF, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल MF, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स, गोल्डमन सॅक्स, फिडेलिटी आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांचा समावेश होता.

व्यवहार पूर्ण झाल्यानंतर एनएसईवर लेन्सकार्ट सोल्यूशन्सचा शेअर १.५८ टक्क्यांनी घसरून ५१५.९० रुपयांवर बंद झाला.

महसुलात वाढ, मात्र नफ्यात घट

लेन्सकार्टने गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीच्या (मार्च तिमाही) निकालानुसार, कंपनीच्या एकत्रित नफ्यात वार्षिक ७.५ टक्क्यांची घट नोंदवली गेली असून तो २०३.६ कोटी रुपयांवर आला आहे. कच्च्या मालाचा खर्च आणि इन्व्हेंटरीवरील खर्च वाढल्याने नफ्यावर हा परिणाम झाला आहे. दुसरीकडे, कंपनीच्या महसुलात मात्र दमदार कामगिरी पाहायला मिळाली. मार्च तिमाहीत ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल ४५.६२ टक्क्यांनी वाढून २,५१६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षाच्या याच तिमाहीत १,७२८ कोटी रुपये होता.