Soham Parekh Moonlighting Confession: अमेरिकेतील मुंबईचा सॉफ्टवेअर अभियंता सोहम पारेख याने एकाच वेळी सिलिकॉन व्हॅलीतील अनेक स्टार्टअप्समध्ये नोकऱ्या केल्याची सार्वजनिकपणे कबुली दिली आहे. हे कबूल करताना त्याने असा दावा केला आहे की, आर्थिक नैराश्यामुळे त्याला एकाच वेळी अनेक ठिकाणी काम करावे लागले.
पारेखला एका मुलाखतीत, एकाच वेळी अनेक पूर्णवेळ नोकऱ्या केल्याच्या आरोपांबद्दल विचारले असता, त्याने म्हटले की, “हे खरे आहे. मी जे केले आहे त्याचा मला अभिमान नाही. त्याचे मी देखील समर्थन करत नाही. पण कोणालाही आठवड्यातून १४० तास काम करायला आवडत नाही, मला ते गरजेपोटी करावे लागले.”
मिक्सपॅनेलचे सह-संस्थापक सुहेल दोशी यांनी स्टार्टअप कंपन्यांना एक्सवरील एका पोस्टच्या माध्यमातून पारेखच्या एकाच वेळी अनेक ठिकाणी नोकऱ्या करण्याच्या प्रकाराबद्दल जाहीरपणे इशारा दिला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
सुहेल दोशी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आरोप केला आहे की, “सोहम पारेख एकाच वेळी तीन ते चार स्टार्टअप्समध्ये काम करून वायसी कंपन्यांना फसवत आहे.” दरम्यान, दोशी यांच्या या पोस्टला २० दशलक्षहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याचबरोबर डझनभर संस्थापकांनी या मुंबईच्या अभियंत्याला कामावर ठेवण्याचे आणि त्वरित काढून टाकण्याचे अनुभव शेअर केले आहेत.
२०१८ मध्ये पदवीचे शिक्षण घेण्याची योजना आखल्यानंतर सोहम पारेख २०२० मध्ये अमेरिकेत स्थलांतरित झाला. या सर्व प्रकरणावर बोलताना त्याने सांगितले की, त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याला त्याचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले.
नोकरी कराराच्या संभाव्य उल्लंघनांबद्दल विचारले असता, पारेखने कबूल केले की, त्याच्या कृती बचाव करण्यायोग्य नाहीत, परंतु त्या दुर्भावनापूर्ण हेतूने नव्हे तर निराशेतून झाल्या आहेत.
सोहम पारेखने त्याच्या जे काही केले त्यामागे लोभापेक्षा गंभीर आर्थिक परिस्थितीला जबाबदार धरले आहे. “मी अत्यंत गंभीर आर्थिक परिस्थितीत होतो,” असे त्याने मुलाखतीत स्पष्ट केले. “मी फारसा बोलका माणूस नाही. माझ्या आयुष्यात काय चालले आहे याबद्दल मी कोणालाही जास्त काही सांगत नाही. म्हणून मी फक्त विचार केला: जर मी अनेक ठिकाणी काम केले तर कदाचित मी स्वतःला या परिस्थितीतून लवकर बाहेर काढू शकेन.”
दरम्यान, सोशल मीडियावर उमटणाऱ्या प्रतिक्रियांना न जुमानता, पारेखने नुकतीच एका एआय व्हिडिओ स्टार्टअपमध्ये विशेष संस्थापक अभियंता पद मिळवल्याची घोषणा केली आहे. एक्स पोस्टमध्ये तो म्हणाला की, “आज सकाळी, मी एका कंपनीत, फक्त एकाच कंपनीत संस्थापक अभियंता होण्यासाठी एक विशेष करार केला आहे. या परिस्थितीतही ही कंपनीच माझ्यावर पैज लावण्यास तयार होती.”