न्यू यॉर्क : अमेरिकी शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्यानंतरच्या पहिल्या तिमाहीत एलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीने वॉल स्ट्रीटच्या अंदाजापेक्षा कमी तोटा नोंदवला असून महसुलात मोठी वाढ झाली आहे. कंपनीने विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील गुंतवणुकीत मोठी वाढ केली आहे.

जून अखेर संपलेल्या या तिमाहीत स्पेसएक्सला ५४१ दशलक्ष अमेरिकन डॉलर (सुमारे ९ सेंट प्रति शेअर) निव्वळ तोटा झाला असून हा तोटा विश्लेषकांनी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा अर्ध्याहून कमी आहे. त्याच वेळी, कंपनीचा महसूल वर्षभरापूर्वीच्या तुलनेत ९० टक्क्यांहून अधिक वाढून ७.८ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.

या तिमाहीत कंपनीचा मुख्य कमाईचा स्रोत ठरलेल्या ‘स्टारलिंक’ या उपग्रह इंटरनेट आणि कनेक्टिव्हिटी व्यवसायात मोठी वाढ दिसून आली. स्टारलिंकच्या ग्राहकांची संख्या दुप्पट होऊन १.२ कोटींवर (१२ दशलक्ष) पोहोचल्याने या विभागाचा महसूल गेल्या वर्षाच्या तुलनेत ६६ टक्क्यांनी वाढला आहे. विश्लेषकांशी चर्चा करताना मस्क म्हणाले, “भविष्यात स्टारलिंक जगभरातील बहुतांश इंटरनेट सेवा पुरवेल अशी शक्यता नाकारता येत नाही.” मंगळवारी नियमित व्यवहारात स्पेसएक्सचा शेअर ९ टक्क्यांनी वधारला होता, परंतु ट्रेडिंगच्या वेळेनंतर त्यातील बहुतांश वाढ घटली. जूनमध्ये आयपीओ आल्यानंतर कंपनीचे समभाग सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते, ज्यामुळे मस्क हे जगातील पहिले ट्रिलियनेअर ठरले होते. मात्र, त्यानंतर कंपनीच्या भागभांडवलात जवळपास निम्म्याने घट झाली आहे.

कंपनीच्या अवकाशीय प्रवास आणि ‘ग्रोक’ या एआय चॅटबॉटच्या भविष्यातील शक्यतांबाबत मस्क यांनी दाखवलेली अवाजवी आश्वासने आणि भविष्यातील जोखीम यामुळे गुंतवणूकदार चिंतित आहेत. याशिवाय, या आठवड्याच्या शेवटी ‘लॉक-अप’ कालावधी संपल्यानंतर कंपनीच्या अंतर्गत भागधारकांना भागविक्रीची संधी मिळणार असल्याने बाजारात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

कंपनीने पायाभूत सुविधा आणि संशोधन व विकासावरील खर्च गेल्या वर्षीच्या ३ अब्ज डॉलरवरून थेट १८ अब्ज डॉलरपर्यंत वाढवला आहे. या मोठ्या खर्चाबद्दल गुंतवणूकदारांनी चिंता व्यक्त केली असता, स्पेसएक्सचे मुख्य वित्त अधिकारी ब्रेट जॉन्सन यांनी पुढील दोन तिमाहींमध्येही असाच भांडवली खर्च राहण्याची शक्यता वर्तवली आहे. या खर्चाचे समर्थन करताना मस्क म्हणाले की, एआयमधील गुंतवणुकीमुळे कंपनीच्या वाढीला गती मिळेल आणि कंपनी १ ट्रिलियन डॉलर महसुलाचे उद्दिष्ट २०२१ ऐवजी २०३० मध्येच पूर्ण करेल.

आयपीओच्या पहिल्या दिवशी समभाग १९ टक्क्यांनी वधारल्यामुळे मस्क यांची संपत्ती विक्रमी पातळीवर पोहोचली होती. मात्र, त्यानंतर स्पेसएक्स आणि टेस्लाच्या शेअर्समधील घसरणीमुळे ‘फोर्ब्स’नुसार त्यांची संपत्ती घसरून ७८३ अब्ज डॉलर झाली आहे.

या चर्चेदरम्यान मस्क यांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्टारशिप’ रॉकेटबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, गेल्या महिन्याच्या अखेरीस स्टारशिपच्या चाचणीदरम्यान यशस्वीरित्या उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. या महिन्याच्या अखेरीस स्पेसक्राफ्ट आणि बूस्टर परत येताना त्यांना यांत्रिक हातांनी पकडून ‘स्टारशिप’च्या पुनर्वापराची चाचणी घेण्याचा प्रयत्न केला जाईल. नासा देखील चंद्रावर पुन्हा अंतराळवीर पाठवण्यासाठी स्टारशिपचा वापर करणार आहे. यावर स्पेसएक्सच्या अध्यक्षा ग्विन शॉटवेल यांनी सांगितले, “आम्हाला २०२८ पर्यंत मानवाला पुन्हा चंद्राच्या पाठीवर उतरवायचे आहे.”

गुरुवारपासून लॉक-अप मर्यादा शिथिल होणार असल्याने बाजारात अतिरिक्त ९० कोटी (९०० दशलक्ष) शेअर उपलब्ध होतील. यामुळे सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या शेअर्सची संख्या दुप्पट होईल आणि आगामी काही महिने शेअर्समध्ये चढ-उतार कायम राहू शकतात. दरम्यान, कंपनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देखील चालवते.