मुंबई / वॉशिंग्टन : एलन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीचा आगामी आयपीओ जागतिक भांडवली बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी घडामोड ठरण्यास सज्ज झाला आहे. तब्बल ७५ अब्ज डॉलर उभारण्याचे लक्ष्य असलेल्या या आयपीओमध्ये कंपनीचे एकूण मूल्यांकन सुमारे १.८ ट्रिलियन डॉलर (सुमारे १५० लाख कोटी रुपये) निश्चित करण्यात आले आहे. मात्र, जागतिक वित्तीय विश्लेषकांच्या मते, हे अवाढव्य मूल्यांकनच या शेअरच्या भविष्यातील वाढीसाठी सर्वात मोठा अडथळा ठरू शकते.

गुंतवणुकीची अभूतपूर्व संधी म्हणून याकडे पाहिले जात असले, तरी सध्याच्या किमतीला हा शेअर खरेदी करणे कितपत फायद्याचे ठरेल, याबाबत तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे.

आयपीओची वैशिष्ट्ये आणि बाजारातील दबाव

स्पेसएक्सचा हा आयपीओ अनेक अर्थांनी वेगळा आहे:

निश्चित किंमत : मस्क यांनी आयपीओसाठी कोणतीही प्राइस बँड (किंमतीची मर्यादा) न ठेवता प्रति शेअर $१३५ ही निश्चित किंमत ठेवली आहे.

नॅस्डॅक १०० मध्ये थेट एन्ट्री : शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत या कंपनीचा ‘नॅस्डॅक १००’ या नामांकित निर्देशांकात समावेश केला जाईल. यामुळे पॅसिव्ह फंड्सना कंपनीचे १० टक्के ते १५ टक्के शेअर्स सक्तीने खरेदी करावे लागतील.

किरकोळ गुंतवणूकदारांची क्रेझ: मस्क यांच्या इतर कंपन्यांप्रमाणेच या आयपीओसाठी जगभरातील किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

ताळेबंद आणि मूल्यांकनाचा ताळमेळ बसेना

स्पेसएक्स ही अंतराळ क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असली, तरी ती सध्या जगातील सर्वात मोठी तोट्यात चालणारी कंपनी आहे. २०२६ च्या अंदाजित विक्रीच्या तुलनेत ४0 पट आणि ‘इबिटडा’च्या तुलनेत तब्बल १७५ पट अधिक मूल्यांकनावर हा आयपीओ आणला जात आहे, जे अत्यंत महागडे आहे.

विश्लेषकांच्या मते, कंपनीचे रास्त मूल्यांकन १.८ ट्रिलियन डॉलरऐवजी १ ट्रिलियन डॉलरच्या आसपास असायला हवे होते.

गुगलसारख्या परताव्याची अपेक्षा करणे चुकीचे?

अनेक गुंतवणूकदार स्पेसएक्सची तुलना गुगलशी करत आहेत. २००४ मध्ये गुगलचा आयपीओ आला तेव्हा त्याचे मूल्यांकन फक्त $२३ अब्ज होते आणि त्यानंतर गुगलने १७,०००% परतावा दिला. स्पेसएक्सने जर असा परतावा द्यायचा ठरवला, तर कंपनीचे मूल्यांकन $३०० ट्रिलियन व्हावे लागेल, जे अशक्यप्राय कोटीतील आहे. तसेच, मस्क यांच्या ‘टेस्ला’ (Tesla) कंपनीने सुरुवातीला ३७० पट परतावा दिला असला, तरी २०२२ पासून टेस्लाच्या नफ्यात वाढ झालेली नाही आणि तिचा शेअरही गेल्या दीड वर्षात एकाच पातळीवर रेंगाळत आहे. मोठी कंपनी झाल्यावर वृद्धीचा वेग मंदावतो, हा नियम स्पेसएक्सलाही लागू पडू शकतो.