वृत्तसंस्था, मॅकअ‍ॅलेन (अमेरिका) : एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीला टेक्सासमधील वन्यजीव अभयारण्यातील ७०० हून अधिक एकर जमीन हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला पर्यावरणवादी संघटनांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. या निर्णयामुळे आधीच स्पेसएक्सच्या रॉकेट प्रकल्पांमुळे बदललेल्या गल्फ किनारपट्टीवरील पर्यावरणीय धोक्यांमध्ये आणखी वाढ होईल, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

नेमका वाद काय?

अमेरिका मासे आणि वन्यजीव विभागाने या महिन्याच्या सुरुवातीला स्पेसएक्ससोबत जमीन अदलाबदलीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या करारानुसार स्पेसएक्सकडील ६८३ एकर जमीन सरकारकडे दिली जाणार असून त्याबदल्यात कंपनीला लोअर रिओ ग्रांडे व्हॅली नॅशनल वाइल्डलाइफ रिफ्यूजमधील ७०० हून अधिक एकर जमीन मिळणार आहे. हे अभयारण्य सुमारे १.०३ लाख एकर क्षेत्रात पसरलेले असून टेक्सास-मेक्सिको सीमेलगतच्या चार काउंटींमध्ये विस्तारलेले आहे. येथे अनेक दुर्मिळ प्राण्यांची अधिवासस्थाने आणि ऐतिहासिक वारसा स्थळे आहेत.

स्पेसएक्सला कसा फायदा?

नकाशांनुसार स्पेसएक्सला मिळणारी जमीन कंपनीच्या प्रक्षेपण केंद्राजवळ आहे. त्यामुळे भविष्यातील विस्तार आणि रॉकेट प्रक्षेपण सुविधा वाढवण्यासाठी कंपनीला मोठा फायदा होऊ शकतो. पर्यावरणवादी संघटनांच्या मते, या भागातील सरकारी जमीन खासगी कंपनीला देण्याचा हा पहिलाच प्रकार आहे.

जैवविविधता संरक्षणासाठी कार्यरत पर्यावरणवादी संस्था ‘सेंटर फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी’ आणि इतर संघटनांनी दाखल केलेल्या खटल्यात म्हटले आहे की, वन्यजीव अभयारण्याचे संरक्षण करण्याऐवजी प्रशासन स्पेसएक्सला अतिरिक्त जमीन देत असल्याचा आरोप केला आहे.

सरकारचा दावा काय?

अमेरिकन वन्यजीव विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अंतिम पर्यावरणीय मूल्यांकन अहवालात या जमीन अदलाबदलीमुळे कोणताही महत्त्वपूर्ण पर्यावरणीय परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे. सरकारच्या मते, या व्यवहारामुळे दीर्घकालीन संवर्धनाला चालना मिळेल आणि दक्षिण टेक्सासमधील विविध अभयारण्यांमधील अधिवासांना अधिक चांगली जोडणी मिळेल. त्यामुळे हा व्यवहार पर्यावरणाच्या दृष्टीने “निव्वळ फायदेशीर” ठरेल, असा दावा प्रशासनाने केला आहे.