मुंबईः परकीय गुंतवणूकदारांकडून निधी विक्रमी रूपात माघारी नेण्याचा सपाटा, १०० डॉलरच्या वर टिकून असलेले खनिज तेलाचे दर आणि अमेरिकी रोख्यांवरील वाढलेला परतावा या कारणाने शेअर बाजारात निरंतर मोठी पडझड सुरू असून, या तीव्र मंदीच्या लाटेत सलग आठव्या आठवड्यात घसरणीचा मागील २५ वर्षांतील विक्रम बाजाराने मोडून काढला आहे. सलग चौथ्या सत्रात घसरणीची मालिका सुरू राहिल्यांनंतर, गुरुवारी सत्रअखेर सेन्सेक्स ५७०.५९ अंशांनी म्हणजेच ०.७९ टक्क्यांच्या घसरणीसह ७१,९०९.७० वर स्थिरावला. सत्रांतर्गत या निर्देशांकातील घसरण दीड टक्क्यांहून अधिक म्हणजे जवळपास १,२०० अंशापर्यंत विस्तारली होती.
तथापि शेवटच्या तासाभरात माहिती-तंत्रज्ञान समभागांतील खरेदीने ही घसरण त्याने निम्म्याने भरून काढता आली. सत्राच्या शेवटी निफ्टी निर्देशांक १९८.५० अंशांनी म्हणजेच ०.८८ टक्क्यांनी घसरून २२,४२१.९५ अंकांवर बंद झाला.सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी मारुती, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, आयटीसी, पॉवर ग्रिड, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि अल्ट्राटेक सिमेंट हे समभाग प्रामुख्याने घसरले. याउलट, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक आणि एचडीएफसी बँक या कंपन्यांचे समभाग वधारले. मागील सत्रात परदेशी गुंतवणूकदारांनी १०,००० कोटी रुपयांहून अधिक रकमेची विक्री केली असतानाच, अमेरिकी रोख्यांच्या परताव्यामधील वाढीमुळे परदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी विक्री पुढेही कायम राहू शकते, असा विश्लेषकांचा होरा आहे.
सलग घसरणीचा २५ वर्षांतील विक्रम मोडीत
- सुटीमुळे आक्रसून चार दिवसांच्या राहिलेल्या आठवड्यात निफ्टी निर्देशांक ३.१ टक्क्यांनी गडगडला असून, सलग आठ आठवड्यांत त्यात एकूण ८.७ टक्क्यांची घसरण झाली आहे.
- सेन्सेक्समध्ये २.७ टक्क्यांची साप्ताहिक घसरण नोंदवली गेली, तर आठ आठवड्यातील त्याचे एकूण नुकसान ८.४ टक्क्यांचे आहे.
- २५ वर्षांपूर्वी ‘डॉट-कॉम बबल’ अर्थात माहिती-तंत्रज्ञान समभागांतील तेजीचा फुगा फुटल्याने सलग सात आठवडे सुरू राहिलेल्या घसरण-मालिकेचा विक्रम यंदाच्या पडझडीने मोडीत काढला आहे.
घसरणीमागील प्रमुख कारणे:
१. चालू वर्षात आतापर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी तब्बल २७,८०० कोटी डॉलर भारतीय बाजारातून काढून घेतले आहेत.
२. खनिज तेलाच्या किमतींचा मानक असणाऱ्या ‘ब्रेंट क्रूड’च्या दरात २.७७ टक्क्यांची वाढ होऊन ते प्रति पिंप १००.८ अमेरिकन डॉलरवर पोहोचले.
३. देशाची तेल आयातीवरील मदार पाहता, त्याच्या किमती १०० डॉलरच्या वर कायम असल्याने देशांतर्गत महागाईचा ताण वाढला आहे.
४. अमेरिकेच्या १० वर्षांच्या रोख्यांवरील परतावा जून २००७ नंतरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने गुंतवणूकदारांचा ओढा त्या सुरक्षित पर्यायाकडे वाढला आहे.
५. देशात मान्सून कमजोर राहिल्यामुळे ग्रामीण भागातील मागणी आणि उपभोगावर परिणाम झाला असून, त्या चिंतेतून ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक ६.२ टक्के, तर वाहन निर्देशांक ५.९ टक्क्यांनी गडगडला.
