नवी दिल्ली: अदानी समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने ‘क्वालिफाइड इन्स्टिट्युशनल प्लेसमेंट’चे (क्यूआयपी) आकारमान सुरुवातीच्या १०,००० कोटी रुपयांवरून वाढवून १५,००० कोटी रुपये केले  आहे. कंपनीच्या या समभाग विक्रीला गुंतवणूकदारांकडून तब्बल ३८,००० कोटी रुपयांच्या बोली प्राप्त झाल्या आहेत.

गुरुवारी सुरू झालेल्या या समभाग विक्रीला मूळ आकाराच्या सुमारे ३.८ पट अधिक मागणी मिळाली. यामध्ये प्रामुख्याने दीर्घकालीन संस्थात्मक गुंतवणूकदारांचा मोठा वाटा होता. या ‘क्यूआयपी’मध्ये कॅपिटल ग्रुप, गोल्डमन सॅक्स, ब्लॅकरॉक, ब्लॅकस्टोन आणि नोमुरा यांसारख्या जागतिक स्तरावरील आघाडीच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या आणि वित्तीय संस्थांनी गुंतवणूक केली आहे. तसेच देशांतर्गत बाजारपेठेतून एचडीएफसी म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड, कोटक म्युच्युअल फंड, आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड, एसबीआय म्युच्युअल फंड आणि टाटा म्युच्युअल फंड यांसारख्या दिग्गज कंपन्यांनी यात सहभाग घेतला.

रोडशोनंतर अवघ्या ४८ तासांत या वाढीव १५,००० कोटी रुपयांच्या समभाग विक्रीला पूर्ण प्रतिसाद मिळाला. अनेक गुंतवणूकदारांनी त्यांना मिळालेल्या वाटपापेक्षा अधिक समभागांची मागणी केली होती, असे सूत्रांनी सांगितले.

अमेरिकेतील कायदेशीर वादाच्या पार्श्वभूमीवर यश

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत सुरू असलेल्या कायदेशीर चौकशीवर गुंतवणूकदार बारीक लक्ष ठेवून आहेत. असे असतानाही कंपनीच्या क्यूआयपीला मिळालेला हा प्रतिसाद लक्षणीय मानला जात आहे. कंपनीने २०२५ मध्ये पूर्ण केलेल्या २५,००० कोटी रुपयांच्या राईट्स इश्यूनंतर  गेल्या वर्षभरातील ही दुसरी मोठी निधी उभारणी आहे.

निधीचा वापर कशासाठी?

समभाग विक्रीतून उभारण्यात येणारा निधी खालील कारणांसाठी वापरला जाईल असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
विविध व्यवसाय क्षेत्रांमधील भांडवली खर्च भागवणे.
कंपनीवरील कर्ज फेडणे.
धोरणात्मक गुंतवणूक आणि नवीन कंपन्यांचे संपादन करणे.

अदानी एंटरप्रायझेस हा अदानी समूहाचा मुख्य व्यवसाय असून, यामध्ये विमानतळ, रस्ते, डेटा सेंटर्स, नवीकरणीय ऊर्जा उत्पादन, पीव्हीसी, धातू आणि खाणकाम अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे.

अल्युमिनियम संयुक्त उपक्रमानंतर मोठी घडामोड

चालू आठवड्यातच अदानी एंटरप्रायझेसने अबू धाबी येथील ‘इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी’ (IHC) सोबत अल्युमिनियम उत्पादनासाठी एका संयुक्त उपक्रमाची घोषणा केली होती. या प्रकल्पात सुमारे ११.५ अब्ज डॉलर (सुमारे १.१ लाख कोटी रुपये) गुंतवणुकीचे नियोजन आहे. या मोठ्या घोषणेनंतर ही निधी उभारणी झाली आहे. या क्यूआयपीसाठी सूचक किंमत प्रति समभाग २,८८३ रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही किंमत ‘सेबी’च्या ३,०३४.६८ रुपयांच्या मूळ किमतीपेक्षा ५ टक्के सवलतीत, तर २ जुलैच्या ३,१७७.५० रुपयांच्या बंद किमतीपेक्षा ९.२७ टक्के सवलतीत आहे. जेफरीज, एसबीआय कॅपिटल मार्केट्स, आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि आयआयएफएल सिक्युरिटीज या समभाग विक्रीचे व्यवस्थापन पाहत आहेत.