Adani Group Shares Recovery: गौतम अदाणी यांच्या समूहाचे २०२३ मध्ये हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपांमुळे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. या आरोपांमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि शेअर बाजारात त्यांच्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात कोसळले होते. पण आता तीन वर्षांनंतर म्हणजेच २०२६ मध्ये अदाणी समूहाच्या कंपन्यांचे शेअर बाजारातील मूल्य पुर्वपदावर आले आहे.
अमेरिकेतील शॉर्ट-सेलर असलेल्या हिंडेनबर्ग रिसर्चने अदाणी समूहावर कॉर्पोरेट गैरवर्तनाचे आरोप केले होते. २०२३ मध्ये केलेल्या या आरोपांनंतर अदाणी समूहाच्या नऊ सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात सुमारे १२.७५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होती. पण आता अदाणी समूहाने पुन्हा हे नुकसान भरून काढले आहे.
गेल्या आठवड्यापासून अदाणी समूहाची सर्व सर्व नऊ शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत. तर अदाणी पॉवरने आपली विक्रमी तेजी कायम ठेवत, या वर्षातील नफा जवळपास ७५% पर्यंत नेला, तर प्रमुख कंपनी अदाणी एंटरप्रायझेसचा शेअरही तेजीत आहे.
यामुळे अदाणी समूहाचे एकत्रित बाजारमूल्य सुमारे १६.९१ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. अदाणी समूहातील शेअर्समध्ये झालेली ही वाढ, गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा अदाणी समूहामध्ये विश्वास निर्माण झाल्याचे दर्शवते.
अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या या वाढीमुळे त्यांचा संकटाचा काळ आता संपल्याचे अधोरेखित होते. हिंडेनबर्गने केलेल्या आरोपांमुळे समूहाला १२ लाख कोटी रुपयांहून अधिक फटका बसला होता. अदाणी समूहाने हिंडेनबर्गचे आरोप सातत्याने नाकारले आहेत आणि भारतीय नियामक चौकशांमध्येही हे दावे सिद्ध झालेले नाहीत, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अदाणी समूहाबाबत सकारात्मक भावना पुन्हा निर्माण झाली आहे.
याचबरोबर अमेरिकेतील एका न्यायालयाने अदाणी समूहावरील फौजदारी आरोप मागे घेण्यास मान्यता दिल्यामुळे समूहातील कंपन्यांच्या तेजीला आणखी बळ मिळाले आहे.
अदाणी पॉवरने इन्फोसिसला टाकले मागे
अदाणी पॉवर ही समूहाची नवीन प्रमुख कंपनी आणि सर्वात मौल्यवान कंपनी म्हणून उदयास आली आहे, जिचे बाजार भांडवल आता सुमारे ४ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. अदाणी पॉवरने नुकतेच बाजार भांडवलाच्या क्रमवारीत दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसला मागे टाकत भारतातील ११वी सर्वात मौल्यवान सूचीबद्ध कंपनी म्हणून स्थान मिळवले आहे. अदाणी पॉवरचे मूल्यांकन अंदाजे ४.८ लाख कोटी रुपये आहे, तर इन्फोसिसचे मूल्यांकन सुमारे ४.७ लाख कोटी रुपये आहे.
२०२६ मध्ये आतापर्यंत, अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये सुमारे ७०-७५% वाढ झाली आहे, तर इन्फोसिसच्या शेअर्समध्ये २५-२८% पेक्षा जास्त घसरण झाली आहे, कारण आयटी क्षेत्रातील शेअर्स जागतिक स्तरावरील आव्हाने आणि नफ्याच्या चिंतेमुळे संघर्ष करत आहेत.
