Annu Projects IPO Listing Loss: अन्नू प्रोजेक्ट्सच्या शेअर्सनी आज २ सप्टेंबर रोजी बीएसई आणि एनएसईवर पदार्पण केले. पण, ज्या गुंतवणूकदारांनी या आयपीओमध्ये गुंतवणूक केली होती त्यांच्यासाठी हे पदार्पण निराशाजनक ठरले. कारण एनएसईवर हा शेअर ७० रुपयांवर उघडला, जो त्याच्या ९९ रुपयांच्या आयपीओ किमतीच्या तुलनेत २९.२९ टक्के कमी होता. तर बीएसईवर तो ७५ रुपयांवर सूचीबद्ध झाला, जो त्याच्या किमतीपेक्षा २४.२४ टक्के कमी होता.

अन्नू प्रोजेक्ट्सच्या शेअर बाजारातील या निराशाजनक पदार्पणातून गुंतवणूकदारांना हे पाहायला मिळाले की, आयपीओ लागला म्हणजे आपल्याला आता नफाच होणार याची हमी नसते.

लिस्टिंगच्या किमतीनुसार, गुंतवणूकदारांना त्यांना मिळालेल्या प्रत्येक लॉटवर ४,०७७ रुपयांचे नुकसान झाले. यातील प्रत्येक लॉटमध्ये १५१ शेअर्स होते. ज्याची एकूण किंमत १४, ९४९ रुपये इतकी होती.

शेअर बाजारात पदार्पण करण्यापूर्वी अन्नू प्रोजेक्ट्सचे शेअर्स ‘ग्रे मार्केट’मध्ये प्रति शेअर ७-८ रुपयांच्या सवलतीच्या दराने व्यवहार करत होते. यावरून लिस्टिंगच्या वेळी शेअर्समध्ये ७-८ टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता दर्शवली जात होती.

अन्नू प्रोजेक्ट्सचा आयपीओ २५ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट या कालावधीत नोंदणीसाठी खुला होता. कंपनीने या आयपीओद्वारे एकूण १७५ कोटी रुपये उभारले. यामध्ये पूर्णपणे नव्या १,७६,८३,००० इक्विटी शेअर्सची विक्री करण्यात आली. कंपनीने प्रति शेअर ९४-९९ रुपये या श्रेणीत शेअर्सची विक्री केली आणि एका लॉटमध्ये १५१ शेअर्स होते.

आकडेवारीनुसार बोली प्रक्रियेदरम्यान या आयपीओला २.९३ पट प्रतिसाद मिळाला आणि १.४२ लाख अर्जांद्वारे ५१३.२६ कोटी रुपयांच्या बोली प्राप्त झाल्या. स्वतंत्रपणे पाहता क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बिडर्सचा हिस्सा १.७२ पट नोंदवला गेला, तर नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा कोटा ३.५५ पट नोंदवला गेला. तसेच, किरकोळ गुंतवणूकदारांकडून याला २.६८ पट प्रतिसाद मिळाला.

अन्नू प्रोजेक्ट्स

दिल्लीस्थित अन्नू प्रोजेक्ट्स ही एक अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम कंपनी आहे. ही कंपनी दूरसंचार पायाभूत सुविधा, सांडपाणी पायाभूत सुविधा आणि गॅस पाइपलाइन या क्षेत्रांमधील अत्यावश्यक ओव्हरहेड आणि भूमिगत सुविधांची रचना, विकास, अंमलबजावणी, संचालन आणि देखभाल या प्रकारची कामे करते.

रोख प्रवाह आणि सरकारी कंत्राटांवरील अवलंबित्व यांसारख्या प्रमुख जोखमींविषयी चिंता व्यक्त करत ब्रोकरेज कंपन्यांनी अन्नू प्रोजेक्ट्सच्या आयपीओबद्दल संमिश्र मते व्यक्त केली होती.