लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी : बँका आणि वित्तीय संस्थांकडील थकीत व तणावग्रस्त कर्जमालमत्ता (स्ट्रेस्ड अॅसेट्स) खरेदी करून त्यांची वसुली व निराकरण करणाऱ्या अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेडने आपल्या प्रारंभिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) १३२ ते १३९ रुपये प्रति समभाग असा किंमतपट्टा निश्चित केला आहे. सुमारे ७३३ कोटी रुपयांचा हा आयपीओ ९ सप्टेंबरला खुला होऊन ११ सप्टेंबरला बंद होणार आहे.

आयपीओपूर्वी ८ सप्टेंबरला सुकाणू अर्थात अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली प्रक्रिया होणार आहे. या आयपीओअंतर्गत एकूण ५.२७ कोटी समभागांची विक्री केली जाणार असून, हा संपूर्णतः ‘ऑफर फॉर सेल’ (ओएफएस) असेल. या ओएफएसमध्ये आर्किलचे प्रवर्तक अॅव्हेन्यू इंडिया रिसर्जन्स पीटीई लिमिटेड आणि भारतीय स्टेट बँक (एसबीआय) यांच्यासह विद्यमान भागधारक लॅथे इन्व्हेस्टमेंट पीटीई लिमिटेड आणि फेडरल बँक आपला हिस्सा विकणार आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, हा आयपीओ पूर्णतः ओएफएस असल्याने कंपनीला या समभाग विक्रीतून कोणताही निधी मिळणार नाही. आयपीओतून मिळणारी संपूर्ण रक्कम समभाग विक्री करणाऱ्या भागधारकांना मिळणार आहे. १३९ रुपये या उच्च किंमतपट्ट्यावर आयपीओचा आकार सुमारे ७३३ कोटी रुपये, तर १३२ रुपये या किमान किंमतीवर सुमारे ६९६ कोटी रुपये राहणार आहे.

सूचिबद्धतेमुळे काय फायदा?

कंपनीने रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस अर्थात मसुदा प्रस्तावामध्ये (आरएचपी) सूचिबद्धतेमागील कारणे स्पष्ट केली आहेत. कंपनीचे समभाग शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्यामुळे कंपनीची दृश्यमानता आणि ब्रँडची ओळख वाढेल, तसेच विद्यमान भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीत तरलता मिळेल. याशिवाय भारतात कंपनीच्या समभागांसाठी सार्वजनिक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. ही अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी असून, बँका आणि वित्तीय संस्थांकडील तणावग्रस्त मालमत्ता व कर्जे ताब्यात घेऊन त्यांचे पुनर्रचना, तारणावरील अधिकारांची अंमलबजावणी आणि समझोता अशा विविध मार्गांनी निराकरण करण्याचे काम करते.

समभाग १७ सप्टेंबरला बीएसई आणि एनएसईवर सूचिबद्ध होणार आहेत.या आयपीओसाठी आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस, आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अँड सिक्युरिटीज आणि जेएम फायनान्शियल हे मर्चंट बँकर म्हणून काम पाहत आहेत.