डॉ. आशिष थत्ते
Baazaar movie insider trading stock market : चित्रपट २०१८ साली बघायचा राहून गेला होता, पण आता बघितल्यावर जास्त चांगला समजला असे वाटते. ‘इनसायडर ट्रेडिंग’ म्हणजे कंपनीच्या आतील बातम्या गुप्तपणे बाहेरच्यांना सांगणे आणि त्यातून नफा कमावणे म्हणजे बाजार नियामक ‘सेबी’च्या कायद्यांचे उल्लंघन. तिमाही निकाल, विलीनीकरण, नुकसान किंवा विलगीकरण अशा काही घडामोडी आणि आतील गोटातल्या लोकांना माहित असतात आणि बाहेर आल्यास समभागांच्या भावांमध्ये चढउतार होण्याची शक्यता असते.
चित्रपटाचे कथानक मुखत्वेकरून या गोष्टीवर आहे. ज्यांना या सगळ्यात कुतुहूल आहे त्यांनी पुढील लेख न वाचता सरळ ‘यूट्यूब’वर जाऊन १.७ कोटी ‘व्ह्यूज’ असणारा चित्रपट विनामूल्य बघावा. अर्थातच हे विसरू नका की वाईट प्रवृत्तीचा अंत शेवटी होतोच आणि तो देखील ‘इनसायडर ट्रेडिंग’मुळेच!
चित्रपटाची कथा सुरू होते, ती अलाहाबाद आणि मुंबई या दोन शहरांतून. रिझवान (रोहन विनोद मेहरा) अलाहाबाद सारख्या छोट्या शहरातून मुंबईत येतो आणि त्याची इच्छा असते शकुन कोठारी (सैफ अली खान) या मोठ्या व्यावसायिकाबरोबर काम करण्याची. इकडे शकुन कोठारी त्याच्या पूर्वइतिहासात कसा लहानपणापासून अंगडिया म्हणून काम करत करत मोठा उद्योगपती बनतो यांची कथा सांगितली आहे.
शकुन जेव्हा आपल्या उद्योगात मग्न असतो तेव्हा बऱ्याच लोकांना त्यांच्या कंपन्या विकायला लावतो त्यावेळेचे प्रसंग सुद्धा कॉर्पोरेट जगतातील कटू वास्तवाची जाणीव करून देतात. त्यात एक कंपनी ‘छेडा ग्रुप ऑफ इंडस्ट्री’ तो बळकावतो त्यात त्याच्या पत्राचे चारित्र्य रंगवले आहे. रिझवान आणि शकुन एका समारंभात चक्क बाथरूममध्ये भेटतात आणि एका कंपनीची गोपनीय किंवा अप्रकाशित माहितीची देवाणघेवाण होताना रिझवान शकुनला या माहितीवर विश्वास न ठेवण्यास सांगतो. अर्थातच चित्रपट असल्यामुळे शकुनचा फायदा होतो आणि तो रिझवानला आपला पोर्टफोलिओ व्यवस्थापक बनवतो. ज्यात एक रकमी १०० कोटी रुपये देऊ करतो.
मग येतो प्रसिद्ध चित्रपटीय सवांद, माझे २ नियम आहेत; माझा पहिला नियम म्हणजे माझे पैसे मी कधी गमावणार नाही. आणि दुसरा नियम म्हणजे पहिला नियम कधी विसरणार नाही. खरेतर हा जगप्रसिद्ध संवाद जगाला दिला तो गुंतवणूकदार गुरु वॉरन बफे यांनी तो ही १९८५ मध्ये. अॅडम स्मिथ यांना मुलाखत देताना वॉरन बफे यांनी जगाला पहिल्यांदा असा सल्ला दिला आणि बॉलीवूडला त्यांचा आवडता सवांद सुद्धा. त्यांच्या सल्ल्यानुसार पहिला नियम म्हणजे पैसे गमावू नका आणि दुसरा नियम म्हणजे पहिला नियम विसरू नका. समभाग खरेदी करताना त्याचे मूल्यांकन करून कमी किमतीत मिळत असेल तर घ्या आणि असे समभाग तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर तुम्ही कधीच पैसे गमावू शकत नाही.
रिझवान काही दिवसानंतर एका कंपनीची गोपनीय माहिती मिळवून त्या शंभर कोटी रुपयांवर बराच फायदा शकुनला करून देतो. एवढे सगळे असले तरी गोपनीय माहिती कुणालाही देणे आणि त्या माहितीवरून समभागांची खरेदी विक्री करणे हा सेबीच्या दृष्टीने गुन्हा आहे. सेबीने गोपनीय माहितीच्या देवाणघेवाणीवर २०१५ मधील नियमांनुसार बंदी आणली आहे. हे नियम दरवर्षी अधिक कडक केले जातात. या माहितीला कायद्यात अप्रकाशित किंमत-संवेदनशील माहिती असे नाव आहे. कंपनीचे संचालक, कर्मचारी, सल्लागार, आमच्यासारखे लेखापाल आणि त्यांचे जवळचे नातेवाईक यांना कंपनीचे ताळेबंद जाहीर करण्यापूर्वी काही दिवस समभाग खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध असतो. आर्थिक निकाल, लाभांश, भांडवली संरचनेत बदल, विलीनीकरण आणि अधिग्रहण, महत्त्वाचे अधिकारी बदल इत्यादी माहिती अप्रकाशित किंमत-संवेदनशील माहितीमध्ये अधिकृत केली आहे. नेमक्या अशाच तरतुदींचा आधार घेत चित्रपटात सुद्धा सेबीचे अधिकारी म्हणजे राणा दासगुप्ता (मनीष चौधरी) शकुनच्या मागे लागलेले असतात. जेव्हा राणा शकुनच्या ऑफिसची झडती घ्यायला जातो तेव्हाचा प्रसंग चांगलाच रंगला आहे.
रिझवान आणि शकुन यांची मैत्री वाढत जाते आणि एक दिवस शकुन रिझवानला स्कायकॉम कंपनीचा २० टक्के मालक होण्याची संधी देतो. रिझवान स्कायकॉम कंपनी चालवायला घेतो आणि त्याचे समभाग स्टॉक एक्सचेंजवर सूचिबद्ध करतो. नवीन स्पेक्ट्रमचे परवाने वाटप होणार असते आणि हे स्पेक्ट्रम स्कायकॉमला मिळणार अशी माहिती सर्वदूर पसरवली जाते. त्यामुळे स्कायकॉमच्या समभागांची किंमत गगनाला भिडते आणि एके दिवशी स्पेक्ट्रमचे वाटप होते पण त्यात कुठलाच हिस्सा स्कायकॉम कंपनीला मिळत नाही. सेबीचे अधिकारी रिझवानला चौकशीसाठी बोलावतात आणि सांगतात की शकुनने स्पेक्ट्रमचे वाटप होण्याच्या काही तास आधी ४०० कोटींचे समभाग विकले. या गोष्टीवर रिझवान शकुनला जाब विचारायला जातो आणि त्याला धक्का बसतो की त्याचा वापर शकुनने आपल्या फायद्यासाठी करून घेतला आहे. मग चित्रपटाच्या शेवटी रिझवान शकुनचे रोखीचे व्यवहार उघडकीला आणतो आणि शकुनला तुरुंगात जावे लागते. जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याची बायको त्यांच्या मुलींना घेऊन निघून गेली असते.
शेअर बाजारामध्ये या पद्धतीला ‘पंप अँड डंप’ असे म्हणतात. सध्याच्या काळात पंपसाठी टेलिग्राम आणि व्हाट्सअँपचा वापर केला जातो. २२ मे २०२६ रोजी सेबीने हेमंत गुप्ता आणि त्यांच्या परिवाराला तब्बल २० कोटी रुपयांचा दंड ठोठावला. जे अशा माध्यमातून काही समभाग लोकांना विकत घेण्याचे सांगत होते आणि दुसरीकडे भाव वाढल्यावर स्वतः विकून नफा कमावत होते. चित्रपटात कित्येक सवांद किंवा दृश्ये व्यापार आणि वित्तीय जगताशी संबंधित आहेत. राधिका आपटे ही मराठमोळी अभिनेत्री देखील असणारा चित्रपट तुम्ही नक्की बघा तोही विनामूल्य पण अर्थातच वित्तीय नजरेतून!
