Patanjali Foods Share Price Crash : बाबा रामदेव ब्रँड ॲम्बेसिडर असलेल्या ‘पतंजली फूड्स लिमिटेड’च्या गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस अत्यंत निराशाजनक ठरला. २५ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कंपनीच्या शेअर्समध्ये १७ टक्क्यांची मोठी घसरण पाहायला मिळाली. काही मिनिटांत पतंजलीचा शेअर ४०७ रुपयांवरुन थेट ३३७ च्या पातळीवर आपटला. या मोठ्या पडझडीसह कंपनीच्या शेअर्समध्ये सलग तिसऱ्या व्यापारी सत्रात घसरण सुरूच राहिली आहे. मात्र, अचानक ही घसरण का झाली? शेअर अजून किती खाली जाणार? चला जाणून घेऊया.
‘पतंजली’चा शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकाजवळ!
आजच्या या घसरणीदरम्यान बाजारात कमालीची खरेदी-विक्री दिसून आला, ज्यामुळे हा केवळ किरकोळ गुंतवणूकदारांचा कल नसून मोठ्या संस्थागत गुंतवणूकदारांनी केलेली नफावसुली किंवा शेअर्सची विक्री असल्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञांनी वर्तवली आहे. गेल्या २० दिवसांचा सरासरी व्हॉल्यूम सुमारे २५ लाख शेअर्सचा असताना, आज दुपारी १२ वाजेपर्यंतच तब्बल २.३ कोटींहून अधिक शेअर्सची देवाणघेवाण झाली. यामध्ये डिलिव्हरी व्हॉल्यूम जास्त असल्याने मोठ्या फंड हाऊसेने खरेदी केल्याची शक्यता आहे. आजच्या घसरणीमुळे शेअर आपल्या ३२८.२ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीच्या अगदी जवळ पोहोचला आहे. तर या शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ६५३.९३ रुपये इतकी आहे.
‘पतंजली फूड्स लिमिटेड’ शेअरची कामगिरी कशी आहे?
‘ब्लूमबर्ग’च्या आकडेवारीनुसार, पतंजली फूड्सच्या समभागाने गेल्या वर्षभरात अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. गेल्या ५२ आठवड्यांत (१ वर्ष) पतंजली फूड्सचा शेअर २७ टक्क्यांनी घसरला आहे. या तुलनेत देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक ‘सेन्सेक्स’ याच कालावधीत ६.३ टक्क्यांनी घसरला आहे. म्हणजेच बाजार घसरणीपेक्षा कंपनीचा शेअर जास्त वेगाने खाली आला आहे. गेल्या महिन्याभरात हा शेअर ७.२% कोसळला आहे.
नफ्यात ४६% वाढ होऊनही शेअर्समध्ये घसरण का?
- मार्च तिमाहीचे निकालानुसार, खाद्यतेल आणि अन्नधान्य विक्रीत झालेल्या वाढीमुळे कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ४६ टक्क्यांनी वाढून ५२३.९७ कोटी रुपये झाला आहे. या तिमाहीत एकूण उत्पन्न ९,५६४.४७ कोटींवरून वाढून ११,२१२.१७ कोटी रुपये झाले आहे.
- संपूर्ण आर्थिक वर्षात पतंजली फूड्सचा निव्वळ नफा १,८१४.४७ कोटींवर पोहोचला आहे, जो आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १,३००.७० कोटी रुपये होता. तसेच वार्षिक एकूण महसूल ४०,३४७.७८ कोटींवर गेला आहे.
- उत्कृष्ट नफा असूनही शेअर्समध्ये झालेली ही १७ टक्क्यांची घसरण गुंतवणूकदारांसाठी धक्कादायक असून, बाजारातील मोठ्या गुंतवणूकदारांनी भविष्यातील आव्हाने पाहता नफावसुली केल्याचे स्पष्ट होत आहे.
पतंजली फूड्स लिमिटेड किती मोठी?
१९८६ साली स्थापन झालेली ‘रुची सोया’ ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतर २०२२ मध्ये पतंजली समूहाने विकत घेऊन तिचे नामकरण ‘पतंजली फूड्स लिमिटेड’ असे केले. आज ही कंपनी देशातील आघाडीची खाद्यतेल उत्पादक कंपनी आहे. कंपनी प्रामुख्याने खाद्यतेल, एफएमसीजी आणि पवन ऊर्जा या तीन क्षेत्रांत कार्यरत आहे. कंपनीचे पतंजली, रुची गोल्ड, न्यूट्रेला, दंत कांती, महाकोश आणि सनरिच यांसारखे लोकप्रिय ब्रँड्स बाजारात मजबूत पकड ठेवून आहेत.
