मुंबई : देशातील आघाडीची दुचाकी असलेल्या बजाज ऑटोने आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत २,७४६ कोटी रुपयांचा, एका तिमाहीतील आतापर्यंतचा सर्वाधिक ‘कर-पश्चात नफा’ नोंदवला. देशांतर्गत आणि निर्यातीचे प्रमाण (volumes) लक्षणीयरीत्या वाढल्यामुळे, कंपनीने वार्षिक तुलनेत ३४ टक्क्यांची वाढ साध्य केली आहे.

या निव्वळ नफ्यामध्ये ३५ कोटी रुपयांच्या एका ‘अपवादात्मक लाभाचा’ समावेश आहे. विक्री कर स्थगन कर्जाची सवलतीच्या दरात मुदतीपूर्वीच परतफेड केल्यामुळे हा लाभ प्राप्त झाला असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. मागील वर्षाच्या याच तिमाहीत, कंपनीचा निव्वळ नफा २,०४९ कोटी रुपये इतका होता.

कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसुलात वार्षिक तुलनेत ३२ टक्के वाढ झाली असून, मार्च तिमाहीत हा महसूल १२,१४८ कोटी रुपयांवरून वाढून १६,००६ कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.व्याज, कर, घसारा आणि अमॉर्टायझेशन पूर्व नफा) वार्षिक तुलनेत ३६ टक्क्यांनी वाढून ३,३२३ कोटी रुपयांवर पोहोचला; जो मागील वर्षाच्या याच तिमाहीत २,४५१ कोटी रुपये इतका होता.

कंपनीच्या लाभांश वितरण धोरणाशी सुसंगत राहून, संचालक मंडळाने ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी, १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक शेअरवर १५० रुपये (१,५०० टक्के ) लाभांश (dividend) देण्याची शिफारस केली आहे.

‘बजाज ऑटो’ ‘शेअर बायबॅक’ची देखील घोषणा केली आहे. लवकर कंपनीकडून त्याबाबत माहिती दिली जाणार आहे. याआधी वर्ष २०२४ मध्ये देखील ‘बजाज ऑटो’ने १०,००० रुपये प्रतिशेअर प्रमाणे बायबॅक केले होते. त्याआधी बजाज ऑटोने जून २०२२ मध्ये २,५०० कोटी रुपयांची समभाग पुनर्खरेदी केली होती. त्यावेळी प्रति समभाग ४,६०० रुपयांनी ही खरेदी करण्यात आली होती.समभाग पुनर्खरेदी हा भागधारकांना त्यांनी गुंतवलेले भांडवल परत करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. ज्यावेळी कंपनीच्या ताळेबंदात रोखीचे प्रमाण १५,००० कोटींच्या पुढे जाते तेव्हा गुंतवणूकदारांना त्याची परतफेड करण्याचा बजाज ऑटोचा प्रयत्न असतो.