Balu Forge Defense Orders Share Price : अवजड अभियांत्रिकी आणि अचूक यंत्रनिर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘बालू फोर्ज इंडस्ट्रीज लिमिटेड’ने (Balu Forge Industries Ltd) संरक्षण, विमाननिर्मिती आणि ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. कंपनीने संरक्षण क्षेत्रातील मिळालेल्या ऑर्डर्सची प्रत्यक्ष पाठवणी सुरू केली असून, आंतरराष्ट्रीय बाजारातून नव्या ऑर्डर्सही मिळवल्या आहेत. यामुळे शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.
अमेरिका-युरोपमध्ये ग्राहक
अवजड अभियांत्रिकी आणि अचूक यंत्रनिर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या बालू फोर्ज इंडस्ट्रीज लिमिटेडने संरक्षण, विमाननिर्मिती, ऊर्जा आणि अवजड वाहन क्षेत्रांत महत्त्वाचे व्यावसायिक व उत्पादनविषयक टप्पे पार केल्याची घोषणा केली आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या संरक्षण क्षेत्रातील ऑर्डर्सची प्रत्यक्ष पाठवणी कंपनीने सुरू केली असून, आपल्या उत्पादन पोर्टफोलिओमधील अत्यंत तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक तोफगोळ्याला गुणवत्ता मान्यता मिळवली आहे. याशिवाय, कठोर तपासणी आणि परीक्षण प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर अमेरिका आणि युरोपमधील दोन आंतरराष्ट्रीय ग्राहकांसह देशातील एका संरक्षण उत्पादन केंद्राकडूनही नव्या ऑर्डर्स मिळवल्या आहेत.
बालू फोर्जकडे मोठ्या ऑर्डर्स
“हा तिमाही कालावधी बालू फोर्जसाठी महत्त्वपूर्ण वळण ठरला आहे. केवळ ऑर्डर्स मिळवण्यापासून त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि पुरवठा करण्याच्या टप्प्यावर कंपनीने वाटचाल केली आहे. १५२ मिमी तोफगोळ्यांची पाठवणी आणि १५५ मिमी ईआरएफबी तोफगोळ्यांच्या निर्मितीत घडवण प्रक्रियेदरम्यान ३ मिमी टीआयआर आणि यंत्राद्वारे अचूक घडणीनंतर ०.३ मिमी भिंतीची जाडी असे कठोर निकष साध्य करणे, हे आमच्या उत्पादन सुविधा आणि प्रक्रिया संरक्षण क्षेत्रातील अत्यंत कडक मानकांची पूर्तता करतात, याचे द्योतक आहे. त्याचवेळी, विमाननिर्मिती क्षेत्रातील उत्पादनांना मिळालेली मान्यता आणि अमेरिका व युरोपमधील नव्या ग्राहकांची भर, कठोर तपासणी प्रक्रियेनंतर मिळालेल्या या संधींसह, आमची क्षमता विविध उद्योगक्षेत्रे आणि जागतिक बाजारपेठांमध्ये विस्तारत असल्याचे बालू फोर्ज इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक त्रिमान चांडोक म्हणाले.
मंगळवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजारात बालू फोर्जचा समभाग ३.६३ टक्क्यांनी वधारून ४८६.७० रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे ५,९०८ कोटींचे बाजारभांडवल आहे.
संरक्षण क्षेत्रात मोठी संधी
गेल्या काही वर्षातील जागतिक स्तरावर अनेक देशांमध्ये संघर्षाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. युद्धामध्ये आता महागड्या तंत्रज्ञानापेक्षा स्वस्त तंत्रज्ञान आणि शस्त्रांचा वापर वाढत असल्याचे इराण-अमेरिका आणि इस्रायल युद्धातून समोर आले आहे. भारतीय डिफेन्स कंपन्या स्वस्तात संरक्षण तंत्रज्ञान तयार करण्यात आघाडीवर आहे. या संधीचा फायदा भारतीय कंपन्यांना होऊ शकतो.
