मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रला (महाबँक) सरलेल्या मार्च तिमाहीत २,०१४ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ३५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
पुणे येथे मुख्यालय महा बँकेने, मागील वर्षाच्या याच कालावधीत १,४९३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. सरलेल्या मार्च तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून ८,६९३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे; जे मागील वर्षी याच कालावधीत ७,७११ कोटी रुपये होते. तर बँकेचे व्याजातून मिळणारे उत्पन्न वाढून ७,७५५ कोटी रुपयांवर पोहोचले, जे मागील वर्षाच्या याच तिमाहीत ६,७३१ कोटी रुपये होते.
मालमत्तेच्या गुणवत्तेच्या आघाडीवर पाहता, मार्च २०२६ अखेर बँकेचे एकूण बुडीत कर्जाचे प्रमाण १.४५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. जे मार्च २०२५ च्या अखेरीस १.७४ टक्के होते. तसेच, निव्वळ बुडीत कर्जाचे प्रमाणही मार्च २०२५ च्या अखेरीस असलेल्या ०.१८ टक्क्यांवरून कमी होऊन, एकूण कर्जांच्या ०.१३ टक्क्यांवर आले आहे.
मार्च २०२६ रोजी संपलेल्या वर्षासाठी, बँकेचा मालमत्तेवरील परतावा(आरओए) सुधारून १.८६ टक्क्यांवर पोहोचला आहे; जो मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस १.७५ टक्के होता. बँकेचे भांडवल पर्याप्तता गुणोत्तर मात्र कमी होऊन १८.३६ टक्क्यांवर आले आहे,जे मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस २०.५३ टक्के नोंदवले गेले होते.
सोमवारच्या सत्रात महाबँकेचा समभाग ३.८६ टक्क्यांनी वधारून ७५.५४ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, बँकेचे ५८,१०२ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.
