Bankex Options Expiry Volatility impacts retail traders as options skyrocket: मुंबई शेअर बाजारात (BSE) ‘बँकेक्स’ निर्देशांकाच्या मासिक एक्स्पायरीच्या दिवशी २७ ऑगस्ट रोजी ६ रुपयांचा ‘६५००० पुट ऑप्शन’ करार काही मिनिटांतच झपाट्याने वाढून १००० रुपयांवर पोहोचला. या प्रकारामुळे ट्रेडर्स चक्रावून गेले. ‘बँकेक्स’च्या पुट ऑप्शन्समध्ये झालेली ही प्रचंड वाढ नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘क्लोजिंग ऑक्शन सेशन’मुळे झाल्याचे अनेक ट्रेडर्सनी म्हटले आहे.
‘सीएएस’ (CAS) ही २० मिनिटांची ऑक्शन प्रक्रिया असते. नियमित ट्रेडिंग संपल्यानंतर दुपारी ३:१५ वाजता ती सुरू होते आणि तिचा वापर शेअर्सचे ‘क्लोजिंग लेव्हल्स’ निश्चित करण्यासाठी केला जातो. सध्याच्या कार्यपद्धतीनुसार, दुपारी ३:१५ ते ३:२० या वेळेत कोणत्याही ऑर्डर्स स्वीकारल्या जात नाहीत. संदर्भ किंमतींची गणना करण्यासाठी करण्यासाठी ही पाच मिनिटे राखून ठेवलेली असतात.
३ ऑगस्ट रोजी ही नवीन प्रणाली लागू झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या काही सत्रांमध्ये ‘निफ्टी ५०’ आणि ‘बीएसई सेन्सेक्स’ या प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी अस्थिरता दिसून आली होती.
२७ ऑगस्ट रोजी, ‘बँक निफ्टी’मध्ये ०.५ टक्क्यांची घसरण झाली असताना, ‘बँकेक्स’ निर्देशांक १.६७ टक्क्यांनी घसरून ६४३१३.१५ वर पोहोचला. ‘बँकेक्स’ करारांमधील या तफावतीबाबतची माहिती अनेक ट्रेडर्स आणि बाजार निरीक्षकांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे.
पाच मिनिटांत २५ लाख
बाजारातील या अस्थिरतेबाबत केलेल्या पोस्टमध्ये एकाने म्हटले, “जर तुम्ही दुपारी ३:२० वाजता ‘Bankex 65000 PE’ मध्ये १ लाख रुपये गुंतवले असते आणि ३:२५ वाजता त्यातून बाहेर पडला असता, तर तुम्ही २५ लाख रुपये कमावले असते. म्हणजेच अवघ्या ५ मिनिटांत २५ पट परतावा.”
विश्लेषकांनी या अस्थिरतेचे कारण भारतातील सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोइंग (SLB) यंत्रणेतील तरलता आणि व्याप्तीचा अभाव असल्याचे म्हटले आहे, ज्यामुळे स्टॉक शॉर्ट करणे कठीण होते.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकारानंतर एक्सचेंजेसनी प्रणाली सुधारण्यासाठी क्लोजिंग ऑक्शन सत्रादरम्यान बेंचमार्क निर्देशांकांसाठी सूचक किंमत प्रदान करणे आणि SLB विभागात कमी मुदतीचे करार सुरू करणे यासारखी पावले उचलली आहेत.
‘ऑप्शन्स ट्रेडिंग’ थांबवण्याचा सल्ला
या संपूर्ण प्रकाराबाबत सीएनबीसी आवाझशी बोलताना त्रिशक्ती असोसिएट्सचे संस्थापक विजय शर्मा म्हणाले, “आम्ही किरकोळ गुंतवणूकदारांना दुपारी ३:१५ वाजता ‘ऑप्शन्स ट्रेडिंग’ थांबवण्याचा सल्ला आधीच दिला होता. ज्यांनी हा सल्ला मानला त्यांना नुकसान टाळता आले असते ‘बँकेक्स’मध्ये तरलता (लिक्विडिटी) कमी आहे. मोठ्या प्रमाणावर खरेदीच्या बोली लावून एका विशिष्ट शेअरची किंमत खाली पाडण्यात आली.”
