Bharat Coking Coal IPO Listing Gains: भारत कोकिंग कोलच्या शेअर्सनी सोमवारी शेअर बाजारात दमदार पदार्पण केले. ९ ते १३ जानेवारीदरम्यान १४७ पट इतके प्रचंड सबस्क्रिप्शन मिळाल्यानंतर, हे शेअर्स ९६ टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर सूचीबद्ध झाले आहेत.

भारत कोकिंग कोल लिमिटेडचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर प्रति शेअर ४५ रुपयांना सूचीबद्ध झाले, जे त्याच्या आयपीओच्या किमतीपेक्षा ९५.६५ टक्के जास्त आहे. १,०७१ कोटी रुपयांच्या या इश्यूसाठी प्रति शेअर २१-२३ रुपये किंमत निश्चित करण्यात आली होती.

दुसरीकडे, बीएसईवर कंपनीचे शेअर्स ४५.२१ रुपयांना सूचीबद्ध झाले, जे आयपीओच्या किमतीपेक्षा ९६.५७ टक्के जास्त आहेत. शेअर्स सूचीबद्ध झाल्यानंतर भारत कोकिंग कोल कंपनीचे बाजार भांडवल २१,०५४.३० कोटी रुपये झाले आहे.

भारत कोकिंग कोलचा १,०७१ कोटी रुपयांचा आयपीओ ९ ते १३ जानेवारी दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. आयपीओला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आणि तो एकूण १४३.८५ पट जास्त सबस्क्राइब झाला.

पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB) राखीव असलेला भाग ३१०.८१ पट, नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (NII) २४०.४९ पट, रिटेल इन्व्हेस्टर्स ४९.३७ वेळा, कर्मचारी ५.१७ पट आणि भागधारकांसाठी असलेला भा ८७.२० पट सबस्क्राइब झाला होता. १ जानेवारी २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी पोर्टफोलिओमध्ये कोल इंडियाचे शेअर्स असलेल्या कोल इंडियाच्या भागधारकांसाठी १०७ कोटी रुपयांचे शेअर्स राखीव होते.

भारत कोकिंग कोलबद्दल

१९७२ मध्ये स्थापन झालेली भारत कोकिंग कोल ही कोल इंडियाची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ती कोकिंग कोल, नॉन-कोकिंग कोल आणि वॉश्ड कोलचे उत्पादन घेते. सप्टेंबर २०२५ पर्यंत, कंपनीच्या नेटवर्कमध्ये ३४ कार्यरत खाणी आहेत, ज्यात चार भूमिगत, २६ ओपनकास्ट आणि चार मिश्रित खाणी आहेत. या खानी झारखंडमधील झरिया आणि पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे आहेत. भारत कोकिंग कोलचे प्राथमिक उत्पादन कोकिंग कोल आहे, जो स्टील आणि वीज उद्योगांमध्ये वापरला जातो. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये, देशाच्या एकूण कोकिंग कोल उत्पादनापैकी ५८.५०% वाटा भारत कोकिंग कोलचा होता.

कंपनीची आर्थिक परिस्थिती

भारत कोकिंग कोलच्या आर्थिक परिस्थितीबाबत बोलायचे झाले तर, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीचा निव्वळ नफा ६६४.७८ कोटी रुपये होता, जो पुढील आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १,५६४.४६ कोटींवर पोहोचला होता. परंतु याच्या पुढच्याच आर्थिक वर्ष २०२५ मध्ये तो १,२४०.१९ कोटींवर आला.

या काळात कंपनीच्या एकूण उत्पन्नातही अनेक चढ-उतार दिसून आले. कंपनीचे एकूण उत्पन्न २०२३ च्या आर्थिक वर्षातील १३,०१८.५७ कोटी रुपये आणि २०२४ च्या आर्थिक वर्षातील १४,६५२.५३ कोटी रुपयांवरून २०२५ च्या आर्थिक वर्षात १४,४०१.६३ कोटी रुपये झाले.

चालू आर्थिक वर्ष २०२६ मध्ये, कंपनीने एप्रिल-सप्टेंबर २०२५ च्या पहिल्या सहामाहीत १२३.८८ कोटी रुपये निव्वळ नफा आणि ६,३११.५१ कोटी रुपये एकूण उत्पन्न मिळवले आहे. सप्टेंबर २०२५ च्या तिमाहीच्या अखेरीस, कंपनीचे एकूण कर्ज १,५५९.१३ कोटी रुपये होते.