Blue Cloud Softech Share hits upper circuit: जगभरातील शेअर बाजारामध्ये आज झालेल्या घसरणीमुळे भारतातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीही मोठ्या प्रमाणात कोसळले. यामुळे बीएसई सेन्सेक्सवर सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल तब्बल ४.५७ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. बाजार कोसळत असतानाही ब्लू क्लाउड सॉफ्टेक सोल्युशन्स या स्मॉल-कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये मात्र मोठी वाढ दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून या शेअरमध्ये खरेदीदारांचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे.

व्यवहाराच्या केवळ दोन दिवसांमध्येच या शेअरने गुंतवणूकदारांना सुमारे ४४ टक्के इतका दमदार परतावा दिला आहे. मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे, हा शेअर बीएसई वर २०% च्या ‘अप्पर सर्किट’ला धडकला आणि २५.९६ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. या तेजीमागील एक महत्त्वाची घडामोड समोर आली असून, त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.

ब्लू क्लाउड सॉफ्टेकने शेअर बाजाराला कळवले आहे की, ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात काम करण्यासाठी स्पेसएक्स इंटरनॅशनल लिमिटेड सोबत प्राथमिक आणि बंधनकारक नसलेल्या व्यावसायिक संधींचा शोध घेत आहेत.

कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये नमूद केले आहे की, सध्या दोन्ही पक्षांमध्ये केवळ माहितीची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी आणि भविष्यातील सहकार्याबाबत चर्चा पुढे नेण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात आला आहे. पण, या चर्चा अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आहेत आणि त्यातून अंतिम करार किंवा संयुक्त उपक्रम होईलच याची कोणतीही हमी नाही. असे असले तरी, केवळ स्पेसएक्स या नावाशी जोडले जाण्यामुळे गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

५ वर्षांत ४५० टक्क्यांहून अधिक परतावा

दरम्यान, या शेअरने गेल्या महिन्यात ३६% आणि गेल्या तीन महिन्यांत ३८% इतका लक्षवेधी परतावा दिला आहे. चालू वर्षात यात १९% ची वाढ झाली आहे. दीर्घकालीन आलेख पाहता, या शेअरने गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना ४६५% इतका ‘मल्टीबॅगर’ परतावा मिळवून दिला आहे. पण, गेल्या वर्षभरात या शेअरमध्ये १३% आणि गेल्या दोन वर्षांत ७०% हून अधिक घसरण झाली आहे.