Canara Bank: सरकारी मालकीच्या कॅनरा बँकेने चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीत ५,१७५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील ४,७७४ कोटी रुपयांच्या तुलनेत नफ्यात ८ टक्क्यांची वाढ झाली आहे.
बँकेच्या निवेदनानुसार, दुसऱ्या तिमाहीत एकूण उत्पन्न वाढून ४०,९३१ कोटी रुपये झाले. मागील वर्षी याच कालावधीत ते ३८,५९८ कोटी रुपये होते. बँकेचे व्याज उत्पन्न ३१,५४४ कोटी रुपयांवरून वाढून ३५,१५९ कोटी रुपये झाले. तसेच, निव्वळ व्याज उत्पन्नात २० टक्क्यांची वाढ होऊन ते ११,००५ कोटी रुपयांवर पोहोचले. मागील वर्षी ते ९,१४१ कोटी रुपये होते. बँकेचे ऑपरेटिंग उत्पन्नही वाढून ८,७५८ कोटी रुपये झाले. मागील वर्षी याच तिमाहीत ते ८,५८८ कोटी रुपये होते.
दरम्यान, बँकेच्या मालमत्ता गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. सप्टेंबर २०२६ अखेरीस एकूण अनुत्पादित मालमत्तेचे (एनपीए) प्रमाण १.३३ टक्क्यांवर आले. सप्टेंबर २०२५ अखेरीस हे प्रमाण २.३५ टक्के होते. निव्वळ एनपीएचे प्रमाणही ०.५४ टक्क्यांवरून घसरून ०.३० टक्क्यांवर आले. त्यामुळे नफ्यातील वाढीसोबतच बँकेच्या मालमत्ता गुणवत्तेतही सुधारणा झाल्याचे दिसून येते.
कॅनरा बँकेच्या शेअर्सची किंमत आज १६ ऑक्टोबर २०२६ रोजी एनएसईवर ११८.२९ रुपयांवर बंद झाली. ही किंमत मागील बंद भाव असलेल्या ११७.१२ रुपयांच्या तुलनेत १.१७ रुपयांनी टक्क्यांनी वाढली आहे.
ब्रोकर्सचे टार्गेट
जागतिक ब्रोकरेज संस्था मॉर्गन स्टॅनलीने कॅनरा बँकेसाठी आपले ‘अंडरवेट’ रेटिंग कायम ठेवले असून १०९ रुपयांची लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. जी सध्याच्या पातळीपासून सुमारे १२% कमी आहे. त्यांच्या मते, बँकेचा दुसऱ्या तिमाहीतील करपश्चात नफा अपेक्षेपेक्षा जास्त राहिला याचे मुख्य कारण म्हणजे निव्वळ व्याज उत्पन्नात झालेली वाढ आणि कमी झालेले परिचालन खर्च. त्यांनी आर्थिक वर्ष २०२७ साठी प्रति शेअर कमाईच्या अंदाजात १३% वाढ, आर्थिक वर्ष २०२८ साठी ६% वाढ आणि आर्थिक वर्ष २०२९ साठी २% कपात केली आहे.
दुसरी ब्रोकरेज संस्था, मोतीलाल ओसवालने कॅनरा बँकेवर १६० रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह ‘बाय’ रेटिंग दिले आहे. जे सध्याच्या पातळीपेक्षा २८ टक्क्यांची वाढ दर्शवते.
(शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. लोसकत्ता ऑनलाईनमध्ये शेअर बाजाराशी संबंधित वृत्त केवळ माहितीच्या उद्देशाने प्रकाशित केले जाते. याला गुंतवणुकीचा समजू नये. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी, वाचकांनी पात्र आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.)
