मुंबई : मुंबईस्थित बिगर-बँकिंग वित्त कंपनी अर्थात एनबीएफसी असलेल्या कॅप्री ग्लोबलच्या व्यवस्थपनाखालील मालमत्ता (एयूएम) सरलेल्या मार्च अखेर ६० टक्क्यांनी वाढून ३६,६२३.३ कोटींवर पोहोचली आहे; मागील वर्षी ही मालमत्ता २२,८६०.२ कोटी इतकी होती.
कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२६ साठीच्या कर-पश्चात वार्षिक नफ्यात (पॅट) जवळपास दुप्पट वाढ नोंदवली आहे. कर्जपुरवठा व्यवसायातील दमदार वाढ आणि खर्चाच्या व्यवस्थापनातील सुधारित कार्यक्षमता यामुळे, कंपनीचा कर-पश्चात नफा (पॅट) मागील वर्षाच्या ४७८.५ कोटींवरून ९८ टक्क्यांनी वाढून ९४८.६ कोटींवर पोहोचला आहे.
आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत, कंपनीचा कर-पश्चात नफा (पॅट) मागील वर्षाच्या याच तिमाहीतील १७७.७ कोटींवरून ५९ टक्क्यांनी वाढून २८२.८ कोटींवर पोहोचला. तसेच, मागील तिमाहीतील २५५.४ कोटींच्या तुलनेतही या नफ्यात ११ टक्क्यांची वाढ झाली आहे.
कंपनीचे गृह कर्ज, सोने तारण कर्ज आणि बांधकाम वित्तपुरवठा कर्ज असे प्रमुख व्यवसाय विभाग आहेत. भक्कम अंमलबजावणी क्षमता, जोखीम व्यवस्थापनातील विवेकपूर्ण दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानावर आधारित ग्राहक-संपर्कावर असलेला विशेष भर; या सामर्थ्यांच्या जोरावर, संपूर्ण देशभर आर्थिक सेवांपासून वंचित असलेल्या ग्राहकांना आधार देण्याच्या कंपनीचे उद्दिष्ट आहे.
विद्यमान वर्षात ग्लोबल कॅपिटलने १ हजार रुपये दर्शनी मूल्याच्या सुरक्षित विमोचनयोग्य आणि सूचिबद्ध रोख्यांची (एनसीडी) विक्री केली होती. विविध मुदत कालावधीच्या मालिकांद्वारे या रोख्यांतून गुंतवणूकदारांना वार्षिक ९.५० टक्क्यांपर्यंत प्रभावी लाभ मिळणार आहे.
