मुंबई: भारतातील अग्रगण्य वित्तीय सेवा पुरवठादार कंपनी ‘चॉईस इंटरनॅशनल लिमिटेड’ने दक्षिण कोरियाची नामवंत वित्तीय संस्था ‘एनएच इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीज’शी धोरणात्मक भागीदारीची गुरुवारी घोषणा केली. या करारांतर्गत, कोरियाची कंपनी चॉईस समूहाची ब्रोकिंग आणि संपत्ती व्यवस्थापन शाखा असलेल्या ‘चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये तब्बल ९०० कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करणार आहे.

भारतीय शेअर बाजारात सध्या छोट्या गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर लक्षणीय वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, चॉईस समूहाच्या वाढीला गती देण्यासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

‘एनएच इन्व्हेस्टमेंट’कडून मिळणारा हा निधी चॉईस इक्विटी ब्रोकिंगच्या व्यवसाय विस्तारासाठी वापरला जाईल. यामध्ये प्रामुख्याने, मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी अर्थात एमटीएफ सुविधेचा विस्तार करणे; अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल सुविधांचा विकास करणे; नवीन ग्राहक जोडणे आणि दर्जेदार आर्थिक उत्पादनांची निर्मिती करणे, त्याचप्रमाणे तज्ज्ञ मनुष्यबळ विकास आणि व्यवसायाची व्याप्ती वाढवणे यांचा समावेश आहे.

या भागीदारीच्या जोरावर चॉईस इक्विटी ब्रोकिंगने पुढील तीन वर्षांत आपल्या दलाली पेढी (ब्रोकिंग) आणि वितरण व्यवसायात पाच पट वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दक्षिण कोरियाच्या प्रगत भांडवली बाजारातील ‘एनएच इन्व्हेस्टमेंट’ कंपनीचा जागतिक अनुभव, तंत्रज्ञान आणि जोखीम व्यवस्थापन कौशल्याचा चॉईस समूहाला मोठा फायदा होईल.

नवीन घडामोडीवर भाष्य करताना, चॉईस इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक अरुण पोद्दार म्हणाले, ‘जागतिक पातळीवरील एवढ्या मोठ्या संस्थेने आमच्यावर दाखवलेला विश्वास हा आमच्या व्यवसाय मॉडेलचा विजय आहे. भारताच्या वित्तीय क्षेत्रातील वाढत्या डिजिटल क्रांतीच्या काळात हा करार आम्हाला ग्राहकांसाठी अधिक नवनवीन सुविधा आणण्यास मदत करेल.’

एनएच इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिन जे वूक म्हणाले, ‘या धोरणात्मक गुंतवणुकीमुळे आमच्या जागतिक व्यवसाय पोर्टफोलिओला अधिक बळकटी मिळेल. दोन्ही संस्थांच्या ताकदीचा एकत्र वापर करून आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार वित्तीय सेवा देऊ.’

एनएच इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीज (NHIS) ही १९६९ मध्ये स्थापन झालेली ही दक्षिण कोरियातील अग्रगण्य सिक्युरिटीज आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंग फर्म आहे. जून २०२६ पर्यंत या कंपनीचे मार्केट कॅपिटल सुमारे १०.९ ट्रिलियन कोरियन वॉन (म्हणजेच ६८,३४३ कोटी रुपये) इतके आहे. तर चॉईस इंटरनॅशनल हा मुंबईत मुख्यालय असलेली वित्तीय सेवा समूह असून, या समूहाचे देशभरात १५ लाखांहून अधिक ग्राहक आणि ६५,००० पेक्षा जास्त बिझनेस असोसिएट्सचे जाळे पसरलेले आहे.