Closing Auction Session Options Trading Volatility Risk: भारतीय शेअर बाजारातील नवीन क्लोजिंग ऑक्शन सेशन प्रणाली दिवसाच्या शेवटी व्यवहाराच्या किमती सुधारण्यासाठी होती. पण यामुळे ऑप्शन्स मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. कारण, या प्रणालीमुळे ऑप्शन्समध्ये काही मिनिटांत मोठा नफा होत असून, तो नफा नाहीसाही होत आहे.
गुरुवारी बीएसईवर नवीन प्रणालीअंतर्गत झालेल्या पहिल्या मासिक ‘एक्सपायरी’च्या वेळी बाजारातील चढ-उतार किती तीव्र असू शकतात, हे पाहायला मिळाले. बँक निर्देशांकाशी संबंधित ६४,००० रुपयांचा ‘पुट ऑप्शन’ सुरुवातीला केवळ १.७० रुपयांना व्यवहार करत होता. काही मिनिटांतच त्याची किंमत ६८.५५ रुपयांपर्यंत म्हणजेच जवळपास ४००० टक्क्यांनी वधारली आणि त्यानंतर ती पुन्हा शून्यावर आली. ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या १५ मिनिटांत घडली.
समजा एखाद्या ऑप्शन्स ट्रेडरने १.७० रुपयांना ऑप्शन खरेदी करून ६८.५५ रुपयांना विक्री केली असती, तर १ हजार रुपयांची गुंतवणूक सुमारे ४०३२४ रुपये झाली असती. म्हणजेच गुंतवणूकदाराला तब्बल ३९३२४ रुपये नफा मिळाला असता आणि परतावा जवळपास ४००० टक्के राहिला असता. मात्र, ऑप्शनची किंमत त्यानंतर पुन्हा शून्यावर आल्याने योग्य वेळी विक्री न केल्यास १ हजार रुपयांची संपूर्ण गुंतवणूक गमवावी लागली असती. म्हणजेच १०० टक्के तोटा झाला असता.
“याचा अर्थ असा की, संपूर्ण ट्रेडिंग सत्रातील जोखीम काही मिनिटांतच एकवटली जाते. जर तुमची गुंतवणूक चुकीच्या बाजूला असेल तर परिस्थितीनुसार निर्णय घेण्यासाठी तुमच्याकडे कदाचित अजिबात वेळ उरणार नाही”, असे मुंबईतील काई सिक्युरिटीजचे डेरिव्हेटिव्ह्ज धोरणतज्ज्ञ मौर्य घेलानी यांनी सांगितले. याबाबत मनीकंट्रोलने वृत्त दिले आहे.
कॅश इक्विटी आणि ऑप्शन्स मार्केट बंद होण्याच्या पद्धतीतील विसंगतीमुळे ही मोठी अस्थिरता निर्माण होते. जे स्टॉक्स डेरिव्हेटिव्ह्जशी संबंधित असतात, त्यांच्या अंतिम किमती क्लोजिंग ऑक्शन सेशनद्वारे ठरतात, परंतु लिलावाची प्रक्रिया सुरू असतानाही ऑप्शन्सचे व्यवहार सुरूच राहतात.
काही मुदत संपणाऱ्या ऑप्शन्सचा व्यवहार जवळजवळ शून्य मूल्यावर होत असल्याने, मूळ निर्देशांकातील एक लहानशी हालचालसुद्धा एका निरुपयोगी कॉन्ट्रॅक्टला मोठा फायदा मिळवून देऊ शकते आणि काही मिनिटांनंतर त्याला पुन्हा निरुपयोगी बनवू शकते.
ऑप्शन्स ट्रेडर्ससाठी याचे परिणाम अत्यंत कठोर असू शकतात. योग्य वेळी खरेदी केल्यास तुम्ही गुंतवलेल्या रकमेच्या कित्येक पट नफा कमवू शकता. मात्र, बाजारातील हालचालीचा पाठलाग करण्यात काही सेकंदांचाही उशीर झाल्यास तुमचे सर्व पैसे बुडू शकतात.
जिंकलो आहोत हे समजेपर्यंत…
ब्रोकरेज फर्म एनरिच मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोनमुडी आर. म्हणाले, “स्क्रीनवर दिसणारे आकडे एखाद्या लॉटरीच्या तिकिटासारखे वाटू शकतात. पण अडचण अशी आहे की, आपण जिंकलो आहोत हे समजेपर्यंत त्या तिकिटाचे मूल्य शून्य झालेले असू शकते.”
