मुंबई : कॉस्मिक पीव्ही पॉवर या सोलर फोटोव्होल्टाइक (पीव्ही) मॉड्यूल्स तयार करणाऱ्या कंपनीने प्रारंभिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (सेबी) मसुदा प्रस्ताव (ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस -डीआरएचपी) दाखल केला आहे.

ही कंपनी भारतातील वेगाने वाढणाऱ्या सोलर फोटो-व्होल्टाइक (पीव्ही) मॉड्यूल उत्पादकांपैकी एक मानली जाते. वर्ष २०२३ ते २०२५ या काळात कंपनीच्या उत्पन्नात सुमारे १२५.८ टक्के इतकी मोठी वाढ झाली, असे केअर रिपोर्टमध्ये नमूद आहे.

‘आयपीओ’च्या माध्यमातून कंपनी सुमारे ५४० कोटी रुपयांचे नवीन शेअर विक्री करणार आहेत, तर विद्यमान भागधारकांकडून सुमारे १०० कोटी रुपये मूल्याचे समभाग ऑफर फॉर सेल अर्थात आंशिक समभाग विक्रीद्वारे उपल्बध केले जाणार आहे. आयपीओच्या माध्यमातून सुमारे ६४० कोटी रुपयांचा निधी उभा राहणार आहे.

या ‘आयपीओ’मधून मिळणारा निधी मध्य प्रदेशातील नर्मदापुरम येथे नवीन उत्पादन प्रकल्प (ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट) उभारण्यासाठी वापरणार आहे, तसेच काही रक्कम सामान्य कॉर्पोरेट कामांसाठी वापरली जाणार आहे.नवीन व नूतनीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडील मॉड्यूल उत्पादकांच्या मान्यताप्राप्त यादीमध्ये (एएलएमएम-१) या कंपनीचा समावेश करण्यात आला आहे. ३० सप्टेंबर २०२५पर्यंतच्या नोंदणीनुसार या कंपनीची उत्पादन क्षमता १.३० जीडब्ल्यू इतकी आहे. यामुळे या कंपनीला सरकारी प्रकल्प, सरकारी मदतीचे वीज प्रकल्प, विविध नूतनीकरणीय ऊर्जा योजना आणि जिथे सोलर मॉड्यूल्स फक्त एएलएमएम-१ प्रमाणित उत्पादकांकडूनच घेणे बंधनकारक आहे, अशा सरकारी योजनांअंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांसाठी सोलर मॉड्यूल्स पुरवता येतात.

याशिवाय, कंपनीने आपल्या दुसऱ्या उत्पादन प्रकल्पाचा समावेश ‘एएलएमएम-१’मध्ये होण्याकरीता अर्ज केला आहे. ३० सप्टेंबर २०२५ रोजीच्या नोंदींनुसार ही कंपनी सोलर पीव्ही मॉड्यूल्स उत्पादन, ईपीसी सेवा (प्रकल्प उभारणी सेवा) आणि अॅल्युमिनियम फ्रेम्स उत्पादन या तीन प्रमुख क्षेत्रांमध्ये काम करीत आहे.

कंपनीचा बीएसई आणि एनएसई या शेअर बाजारांमध्ये समभाग सूचिबद्ध करण्याचा मानस आहे. या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स म्हणून सिस्टीमॅटिक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस लि. आणि वाल्मिकी लीला कॅपिटल प्रा. या कंपन्या काम पाहत आहेत.