गौरव मुठे
Covered Call Strategy :
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या अनेक गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन दीर्घकालीन असतो. एखाद्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्याची भविष्यातील कामगिरी चांगली राहील, या अपेक्षेने गुंतवणूकदार हे शेअर दीर्घकाळ स्वतःकडे ठेवतात. मात्र, शेअरच्या किमतीत अपेक्षित वाढ होईपर्यंत या गुंतवणुकीतून नियमित उत्पन्न मिळत नाही. अशा वेळी आधीपासूनच पोर्टफोलिओमध्ये असलेल्या शेअर्सचा वापर करून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची एक स्ट्रॅटेजी म्हणजे ‘कव्हर्ड कॉल’. थोडक्यात कव्हर्ड कॉल या स्ट्रॅटेजीचा मुख्य उद्देश म्हणजे आधीपासून गुंतवणूक केलेल्या शेअरची विक्री न करता, त्यांच्यावर कॉल ऑप्शन विकून अतिरिक्त प्रीमियम उत्पन्न मिळवणे असा आहे.

या स्ट्रॅटेजीमध्ये गुंतवणूकदार रोख बाजारात (कॅश मार्केट) शेअर खरेदी करतो किंवा आधीपासून असलेले शेअर स्वतःकडे ठेवतो. त्याच वेळी त्या शेअरचा ठराविक स्ट्राइक प्राइस असलेला कॉल ऑप्शन विकतो. कॉल ऑप्शन विकल्यामुळे गुंतवणूकदाराला प्रीमियम मिळतो. हा प्रीमियम म्हणजे शेअरची विक्री न करताही मिळणारे उत्पन्न. या प्रीमियममुळे शेअरची प्रभावी खरेदी किंमत काही प्रमाणात कमी होते.

स्ट्रॅटेजी कशी काम करते?

समजा, एखाद्या गुंतवणूकदाराने एका कंपनीचे शेअर १,५९० रुपये दराने खरेदी केले आहेत. त्याला हे शेअर काही काळ स्वतःकडे ठेवायचे आहेत. त्याच वेळी तो १,६०० रुपये स्ट्राइक प्राइस असलेला कॉल ऑप्शन विकतो. या व्यवहारातून त्याला प्रति शेअर १० रुपये प्रीमियम मिळतो. म्हणजेच शेअर खरेदीसाठी १,५९० रुपये खर्च केले असले, तरी मिळालेल्या १० रुपयांच्या प्रीमियममुळे त्याची प्रभावी खरेदी किंमत १,५८० रुपये होते. आता मुदतपूर्तीच्या वेळी शेअरच्या किमतीनुसार या एकत्रित व्यवहाराचा परतावा बदलतो.

शेअरची किंमत वाढल्यास काय होईल?

समजा, शेअरची किंमत १,५९० रुपयांवरून वाढून १,६४० रुपयांवर पोहोचली. रोख बाजारातील शेअरमधून गुंतवणूकदाराला ५० रुपयांचा नफा होईल. मात्र, त्याने १,६०० रुपये स्ट्राइक प्राइसचा कॉल ऑप्शन विकलेला असल्याने ऑप्शनमधील व्यवहारात त्याला ३० रुपयांचा तोटा होईल. कारण ऑप्शनच्या खरेदीदाराला १,६०० रुपयांना शेअर खरेदी करण्याचा अधिकार मिळतो.

या दोन्ही व्यवहारांचा एकत्रित विचार केल्यास २० रुपयांचा निव्वळ नफा मिळतो.
रोख बाजारातील नफा : १,६४० – १,५९० = ५० रुपये
कॉल ऑप्शनमधील तोटा : १० रुपये प्रीमियम – ४० रुपये अंतर्निहित मूल्य = उणे ३० रुपये
एकत्रित निव्वळ नफा : ५० – ३० = २० रुपये

शेअरची किंमत १,६०० रुपयांपेक्षा अधिक वाढली, तरी या उदाहरणात गुंतवणूकदाराचा कमाल नफा २० रुपये इतकाच राहतो. कारण शेअरमधील पुढील वाढीचा फायदा कॉल ऑप्शनच्या खरेदीदाराला मिळतो.

शेअरची किंमत घसरल्यास काय होईल?

दुसरीकडे, शेअरची किंमत १,५९० रुपयांवरून घसरून १,५२० रुपयांवर आली, तर रोख बाजारातील गुंतवणुकीत ७० रुपयांचा तोटा होईल. मात्र, कॉल ऑप्शन विकल्यामुळे मिळालेले १० रुपयांचे प्रीमियम गुंतवणूकदाराकडे राहील. मुदतपूर्तीच्या वेळी शेअरची बाजारातील किंमत १,६०० रुपयांच्या स्ट्राइक प्राइसपेक्षा कमी असल्याने ऑप्शन खरेदीदाराला बाजारभावापेक्षा जास्त दराने शेअर खरेदी करण्यात अर्थ राहणार नाही. त्यामुळे कॉल ऑप्शनमधील १० रुपयांचे प्रीमियम हे उत्पन्न म्हणून गुंतवणूकदाराकडे राहते. परिणामी, एकूण तोटा ७० रुपयांऐवजी ६० रुपयांवर मर्यादित राहतो.

कव्हर्ड कॉलमधील परताव्याचे गणित

खालील तक्त्यात शेअरची मूळ खरेदी किंमत १,५९० रुपये, कॉल ऑप्शनचा स्ट्राइक प्राइस १,६०० रुपये आणि मिळालेले प्रीमियम १० रुपये गृहीत धरले आहे. तक्त्यातील आकडे प्रति शेअर आहेत.

मुदतपूर्तीवेळचा शेअरभावशेअरमधील नफा/तोटाकॉल ऑप्शनमधील नफा/तोटाएकत्रित नफा/तोटा
१,४९०-१००+१०-९०
१,५००-९०+१०-८०
१,५१०-८०+१०-७०
१,५२०-७०+१०-६०
१५३०-६०+१०-५०
१५४०-५०+१०-४०
१५५०-४०+१०-३०
१५६०-३०+१०-२०
१५७०-२०+१०-१०
१५८०-१०+१००
१५९००+१०+१०
१६००+१०+१०+२०
१६१०+२०-१०+१०
१६२०+३०-२०+१०
१६३०+४०-३०+१०
१६४०+५०-४०+२०
१६५०+६०-५०+२०
१६७०+७०-६०+२०
१६८०+८०-७०+२०
१६९०+९०-८०+२०

१,६०० रुपयांवरील शेअरभावासाठी कॉल ऑप्शनमधील नफा-तोटा मोजताना मिळालेले १० रुपयांचे प्रीमियम आणि स्ट्राइक प्राइसपेक्षा अधिक असलेले शेअरचे मूल्य यांचा विचार केला आहे. त्यामुळे १,६०० रुपयांनंतर एकत्रित नफा २० रुपयांवर स्थिर राहतो.

कव्हर्ड कॉल आणि शॉर्ट पुट यांच्यातील साम्य

वरील तक्त्यावरून लक्षात येते की, शेअर खरेदी करून त्यावर कॉल ऑप्शन विकण्याच्या या स्ट्रॅटेजीचा परतावा हा १,६०० रुपये स्ट्राइक प्राइस असलेल्या शॉर्ट पुट रणनीतीसारखा दिसतो. याला ‘सिंथेटिक शॉर्ट पुट’ असे म्हटले जाते. म्हणजेच दोन वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवहारांतून समान स्वरूपाचा परतावा तयार होऊ शकतो. उदाहरणार्थ, या कव्हर्ड कॉलमधून २० रुपये प्रीमियमसह एकत्रित कमाल नफा मिळत असेल आणि त्याच स्ट्राइक प्राइसचा पुट ऑप्शन १७ रुपयांना उपलब्ध असेल, तर सैद्धांतिकदृष्ट्या दोन्ही व्यवहारांतून ३ रुपयांच्या फरकाची संधी निर्माण होऊ शकते. मात्र, प्रत्यक्ष बाजारात ब्रोकरेज, कर, व्यवहार खर्च, निधीचा खर्च आणि इतर अडथळे लक्षात घेतल्याशिवाय अशा संधीला जोखीममुक्त नफा म्हणता येणार नाही.

स्ट्राइक प्राइस निवडताना काय काळजी घ्याल?

कव्हर्ड कॉल स्ट्रॅटेजीमध्ये स्ट्राइक प्राइसची निवड अत्यंत महत्त्वाची असते. सध्याच्या बाजारभावाच्या जवळचा स्ट्राइक प्राइस निवडल्यास तुलनेने अधिक प्रीमियम मिळू शकतो. मात्र, शेअरची किंमत वाढल्यास गुंतवणूकदाराचा संभाव्य नफा लवकर मर्यादित होतो. याउलट, सध्याच्या बाजारभावापेक्षा अधिक दूरचा स्ट्राइक प्राइस निवडल्यास मिळणारे प्रीमियम कमी असू शकते; परंतु शेअरच्या किमतीत वाढ झाल्यास अधिक नफा मिळवण्याची संधी उपलब्ध राहते.

त्यामुळे स्ट्राइक प्राइस निवडताना संबंधित शेअरबाबतचा दृष्टिकोन, अपेक्षित लक्ष्यभाव आणि प्रीमियममधून मिळणारे उत्पन्न यांचा समतोल साधावा. उदाहरणार्थ, गुंतवणूकदाराला एखादा शेअर १,६०० रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा असेल, तर तोपर्यंत १,६०० रुपये स्ट्राइक प्राइसचे कॉल ऑप्शन विकून प्रीमियम मिळवण्याचा विचार करू शकतो. शेअरचा बाजारभाव लक्ष्यभावाजवळ पोहोचल्यास शेअरची विक्री करून ऑप्शनमधील व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेता येतो. मात्र, ऑप्शनची मुदत, बाजारभाव आणि व्यवहार बंद करण्यासाठी लागणारा खर्च यांचाही विचार करणे आवश्यक आहे.

कोणासाठी उपयुक्त?

ज्या गुंतवणूकदारांकडे आधीपासून एखाद्या कंपनीचे शेअर आहेत आणि ज्यांना ते तातडीने विकायचे नाहीत, पण काही काळ शेअरची किंमत मर्यादित पट्ट्यात राहील किंवा फार मोठी वाढ होणार नाही, असे वाटते, त्यांच्यासाठी कव्हर्ड कॉल स्ट्रॅटेजी उपयुक्त ठरू शकते. यात प्रीमियममुळे शेअरची प्रभावी खरेदी किंमत कमी होते आणि किंमत स्थिर राहिल्यास अतिरिक्त उत्पन्न मिळते. मात्र, शेअरची किंमत मोठ्या प्रमाणात घसरल्यास प्रीमियममुळे होणारी नुकसानभरपाई मर्यादित असते. त्यामुळे ही रणनीती जोखीममुक्त नाही. शेअरची घसरण सहन करण्याची क्षमता, ऑप्शन व्यवहारांचे ज्ञान आणि योग्य स्ट्राइक प्राइसची निवड या बाबी महत्त्वाच्या ठरतात.

या उदाहरणात ब्रेक-इव्हन किंमत १,५८० रुपये आहे. म्हणजे मुदतपूर्तीच्या वेळी शेअरचा भाव १,५८० रुपयांवर असेल तर एकत्रित नफा-तोटा शून्य राहतो. कमाल नफा २० रुपये प्रति शेअर आहे; मात्र शेअरची किंमत कितीही घसरली तरी तोटा होऊ शकतो.

अस्वीकृती : यात नमूद केलेले उदाहरण आणि आकडेवारी केवळ स्ट्रॅटेजी समजून घेण्यासाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणूक सल्ला किंवा शेअर अथवा ऑप्शन्स व्यवहार करण्याची शिफारस नाही. कव्हर्ड कॉल स्ट्रॅटेजीमध्ये प्रीमियममधून मर्यादित उत्पन्न मिळत असले, तरी मूळ शेअरच्या किमतीत मोठी घसरण झाल्यास गुंतवणूकदाराला तोटा होऊ शकतो. ऑप्शन्स व्यवहार करण्यापूर्वी त्यातील जोखीम, संभाव्य तोटा आणि आर्थिक परिणाम समजून घ्यावेत. गुंतवणुकीचा निर्णय स्वतःच्या जोखीमक्षमतेनुसार आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावा.

gaurav.muthe@expressindia.com