Share Market: इराण-अमेरिका यांच्यातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती गगणाला भिडल्या आहेत. कच्च्या तेलाने आता प्रति बॅरल १०० डॉलर्सची पातळी गाठली असून, हे दर याच पातळीवर राहिल्यास ही बाब भारतीय शेअरबाजारासाठी चिंताजन ठरू शकते, असे ‘इक्विनोव्हा इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स’चे सह-संस्थापक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी अनिरुद्ध सरकार यांनी म्हटले आहे.

अनिरुद्ध सरकार यांनी एनडीटीव्ही प्रॉफिट या वृत्तवाहिनीवर बोलताना सांगितले की, कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ८५ ते १०० डॉलर्सच्या दरम्यान राहतील हे बाजाराने आधीच गृहीत धरले आहे. परंतु जास्त काळ हे दर १०० डॉलर्सच्या वर राहिल्यास ती चिंतेची बाब असू शकते. तरीही, देशांतर्गत आर्थिक स्थिती आणि कंपन्यांची कमाई भक्कम असल्याने भारतीय बाजाराबाबतचा आपला आशावाद कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकार यांनी खाजगी बँकांमध्ये कमी गुंतवणूक आणि आयटी क्षेत्राबाबत मंदीचा दृष्टिकोन ठेवला आहे, ज्यामुळे दोन्ही क्षेत्रांबाबत त्यांची सावध भूमिका दिसून येते. दुसरीकडे ते संरक्षण आणि अभियांत्रिकी क्षेत्रांबाबत प्रचंड आशावादी आहेत. अभियांत्रिकी आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्रातील निर्यातीला चालना मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे.

गुंतवणूकदारांना सरकार यांनी डेटा सेंटर्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. ऊर्जा क्षेत्रात, किमतींमध्ये अधूनमधून वाढ होण्याची त्यांना अपेक्षा आहे.

अनिरुद्ध सरकार शेअर बाजाराबद्दल आशावादी असले तरी, त्यांनी महागाई एक प्रमुख चिंतेचा विषय असल्याचे नमूद करत, “महागाई ही एक मोठी समस्या आहे”, असे म्हटले.

महागाईचा धोका आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती असूनही, देशांतर्गत आर्थिक स्थिती आणि कंपन्यांची कमाई मजबूत आहे, असा त्यांचा विश्वास आहे. यावेळी त्यांनी कच्च्या तेलाच्या किमतींमधील अलीकडील वाढ तात्पुरती असल्याचा पुनरुच्चार केला.

कच्च्या तेलाचे आजचे दर

मध्यपूर्वेतील संघर्ष अधिकच तीव्र होत असल्याने जागतिक तेल पुरवठ्यावर याचा मोठा परिणाम होत आहे. मंगळवारी तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली. ब्रेंट क्रूडच्या किमतीत ०.०५ डॉलर्सची वाढ होऊन ती ९७.०५ डॉलर्सवर पोहोचली, तर डब्ल्यूटीआय क्रूडच्या किमतीत ०.९४ डॉलर्सची वाढ होऊन ती ९२.४२ डॉलर्स झाली.