Hrithik Roshan Share Sale Cult.Fit IOP: फिटनेस क्षेत्रातील आघाडीची कंपनी कल्ट.फिट लिमिटेडचा आयपीओ लवकरच शेअर बाजारात दाखल होणार आहे. याचाच भाग म्हणून कंपनीने सेबीकडे आपला ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ (DRHP) दाखल केला आहे. या आयपीओद्वारे कंपनी सुमारे ९५० कोटी रुपये उभारणार असून, बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनसह अनेक विद्यमान गुंतवणूकदारांना बाहेर पडण्याची संधीही उपलब्ध करून देणार आहे.

कल्ट फिटच्या या आयपीओमध्ये ९५० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स आणि विद्यमान भागधारकांकडून प्रत्येकी १ रुपया दर्शनी मूल्य असलेल्या १७.८६ कोटींपर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ‘ऑफर फॉर सेल’ यांचा समावेश असेल.

डीआरएचपी नुसार, हृतिक रोशनकडे कंपनीचे १९ लाख इक्विटी शेअर्स आहेत आणि तो ‘ओएफएस’द्वारे ६,३३,८१३ पर्यंत शेअर्स विकण्याची योजना आखत आहे. शेअर्सची विक्री करणाऱ्या भागधारकांपैकी सह-संस्थापक मुकेश बन्सल हे सर्वाधिक हिस्सा विकणार असून, ते १.६० कोटी पर्यंत इक्विटी शेअर्सची विक्री करतील.

ओएफएसमध्ये सहभागी होणाऱ्या इतर भागधारकांमध्ये ‘ओनिक्स’चे सह-संस्थापक असाफ अविदान अँटोनिर ३९ लाख शेअर्स, ‘एचपी ॲडेसिव्हज’चे व्यवस्थापकीय संचालक करण हरेश मोटवानी ९ लाख शेअर्स, मुकुल देवरास २ लाख शेअर्स आणि ‘फिट-एड्यु-कोच’च्या संस्थापक व सीईओ श्रद्धा सेठ ४९,८४९ शेअर्सची विक्री करणार आहेत.

या आयपीओचे व्यवस्थापन ॲक्सिस कॅपिटल, गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज, जेफरीज इंडिया, जेएम फायनान्शियल आणि मॉर्गन स्टॅनली इंडिया यांच्याद्वारे केले जात आहे. या कंपन्यांची या आयपीओसाठी ‘बुक-रनिंग लीड मॅनेजर्स’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कल्ट फिटची आर्थिक परिस्थिती

मुकेश बन्सल आणि अंकित नागोरी यांनी २०१६ मध्ये स्थापन केलेले कल्ट फिट भारतातील सर्वात मोठ्या फिटनेस प्लॅटफॉर्मपैकी एक प्लॅटफॉर्म असून, कंपनी ७७ शहरांमध्ये ७०८ फिटनेस सेंटर्स चालवते. कंपनीने अलीकडच्या काळात महसुलात दमदार वाढ नोंदवली आहे. आर्थिक वर्ष २५ मधील १,२१६ कोटी रुपयांच्या तुलनेत, आर्थिक वर्ष २६ मध्ये कंपनीचा महसूल ४० टक्क्यांनी वाढून १,७२१ कोटी रुपयांच्या वर पोहोचला आहे.

कंपनी अजूनही तोट्यात असली, तरी तिच्या नफाक्षमतेत सातत्याने सुधारणा होत आहे. कंपनीने आपला निव्वळ तोटा आर्थिक वर्ष २०२४ मधील ८८८ कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २०२५ मधील ४८१ कोटी रुपयांवरून कमी करून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये २५२ कोटी रुपयांपर्यंत आणला आहे.