मुंबई : वाहन क्षेत्रातील आघाडीची विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादक कंपनी ‘धूत ट्रान्समिशन लिमिटेड’ने आगामी प्रारंभिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) बाजार नियामक ‘सेबी’कडे सुधारित मसुदा सादर केला आहे. जागतिक गुंतवणूक संस्था ‘बेन कॅपिटल’चे पाठबळ असलेली ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून नवीन समभागांसह प्रवर्तकांकडील हिस्सेदारी ‘ऑफर फॉर सेल’च्या (OFS) माध्यमातून विक्री करणार आहे.
या प्रस्तावित आयपीओ प्रस्तावांतर्गत कंपनी १,४०० कोटी मूल्याचे नवीन इक्विटी समभाग विक्री करणार आहे. याशिवाय, ‘ऑफर फॉर सेल’च्या माध्यमातून प्रवर्तक आणि प्रवर्तक समूहाकडून १.६३ कोटी इक्विटी समभागांची विक्री करेल. यामध्ये बेन कॅपिटलची उपकंपनी ‘बीसी एशिया इन्व्हेस्टमेंट्स एक्सव्ही लिमिटेड’ १.३१ कोटींहून अधिक समभाग विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे.
उभारण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग प्रामुख्याने खालील कामांसाठी केला जाईल:
कर्जमुक्ती : कंपनी आणि तिच्या उपकंपन्यांवरील सुमारे ७६६.४८ कोटींच्या थकीत कर्जाची पूर्ण किंवा मुदतीपूर्वी परतफेड करणे.
नवे उत्पादन प्रकल्प: हरियाणातील झज्जर आणि तामिळनाडूतील होसूर (शूलागिरी) येथे नवीन वायरिंग हार्नेस उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी १५० कोटींची गुंतवणूक.
विस्तार : संभाव्य धोरणात्मक संपादन आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टे पूर्ण करणे.
ईव्ही (EV) बाजारात भक्कम पकड
वर्ष १९९९ मध्ये स्थापन झालेली धूत ट्रान्समिशन ही भारतातील दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या वायरिंग हार्नेस बाजारपेठेत दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये या पारंपारिक बाजारपेठेत कंपनीचा हिस्सा ४४.६४ टक्के होता. विशेष म्हणजे, इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात कंपनीचा दबदबा असून, इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वायरिंग हार्नेस बाजारपेठेत कंपनीचा हिस्सा तब्बल ७० टक्क्यांहून अधिक आहे. कंपनीच्या एकूण महसुलात ईव्ही विभागाचा वाटा आर्थिक वर्ष २०२३ मधील ८.०५ टक्क्यांवरून वाढून २०२५ मध्ये २५.२ टक्के झाला आहे.
कंपनीचा ९० टक्के महसूल देशांतर्गत बाजारपेठेतून येतो आणि बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर, होंडा आणि रॉयल एनफिल्ड हे कंपनीचे प्रमुख ग्राहक आहेत. सध्या कंपनीचे देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर २२ कार्यरत उत्पादन प्रकल्प आहेत. या आयपीओसाठी ॲक्सिस कॅपिटल, जेफ्रीज इंडिया, कोटक महिंद्र कॅपिटल, नोमुरा फायनान्शिअल, एसबीआय कॅपिटल मार्केट्स आणि ३६० वन वाम हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स म्हणून काम पाहत आहेत.
