Donald Trump Stock Portfolio 2026: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे दुसऱ्यांदा हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प सतत या ना त्या कारणाने चर्चेत आहेत. आता ते त्यांच्या शेअर बाजारातील गुंतवणुकीमुळे चर्चेत आले आहेत. ताज्या आर्थिक तपशीलांवरून असे दिसून येते की, वर्षाच्या पहिल्या तिमाहीत त्यांनी प्रमुख अमेरिकन कंपन्यांचे शेअर्स आणि रोखे (Bonds) मोठ्या प्रमाणावर खरेदी केले आहेत. या व्यवहारांची एकूण किंमत कोट्यवधी डॉलर्सच्या घरात, किंबहुना त्याहूनही अधिक असण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या ‘ऑफिस ऑफ गव्हर्नमेंट एथिक्स’कडे (US Office of Government Ethics) दाखल करण्यात आलेल्या १०० हून अधिक पानांच्या दोन कागदपत्रांमध्ये या डोनाल्ड ट्रम्प यांच्या या नव्या गुंतवणुकीचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये खरेदी आणि विक्री केलेल्या शेअर्स आणि रोख्यांची यादी दिली आहे.
कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली?
काल (१४ मे २०२६) प्रसिद्ध करण्यात आलेल्या या कागदपत्रांनुसार, पहिल्या तिमाहीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी Nvidia Corp., Oracle Corp., Microsoft Corp., Boeing Co. आणि Costco Wholesale Corp. यांसारख्या कंपन्यांमध्ये प्रत्येकी ५ दशलक्ष डॉलर्सपर्यंतची गुंतवणूक केली आहे.
या एकूण गुंतवणुकीपैकी त्यांनी शेअर्समध्ये किती गुंतवणूक केली आहे हे स्पष्ट करण्यात आले नाही. काँग्रेस सदस्यांनी सादर कराव्या लागणाऱ्या व्यवहारांच्या अहवालांप्रमाणे, राष्ट्राध्यक्षांना मात्र आपण ज्या मालमत्तेते गुंतवणूक किंवा विक्री करत आहोत, तिचा प्रकार (asset class) नमूद करणे बंधनकारक नसते.
कोणत्या कंपन्यांचे शेअर्स विकले?
या कागदपत्रांनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी १० फेब्रुवारी २०२६ रोजी मोठी विक्री केली. त्यावेळी ट्रम्प यांनी Microsoft, Meta Platforms Inc. आणि Amazon.com Inc. या तीन तंत्रज्ञान कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी विकली. या व्यवहारांची रक्कम ५ दशलक्ष ते २५ दशलक्ष डॉलर्सच्या दरम्यान होती. याव्यतिरिक्त, जानेवारी महिन्यात त्यांनी ‘Vanguard ETF’ मधील आपली हिस्सेदारीही विकली, जिचे मूल्य किमान ५ दशलक्ष डॉलर्स इतके होते.
S&P 500 साठी २०२६ कसे असेल?
गोल्डमन सॅक्स रिसर्च मधील अमेरिकन इक्विटीचे मुख्य रणनीतीकार बेन स्नायडर यांनी आपल्या अहवालात नमूद केल्यानुसार (२४ एप्रिलच्या स्थितीनुसार), S&P 500 मध्ये ६% वाढ होऊन, वर्षाच्या अखेरीस तो ७,६०० च्या पातळीवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हा अंदाज, २०२६ मध्ये ‘प्रति शेअर कमाई’मध्ये (Earnings-per-share) १२% आणि २०२७ मध्ये १०% वाढ होण्याच्या अपेक्षांवर आधारित आहे. हा निर्देशांक सध्या ‘प्राइस-टू-अर्निंग्स’ (P/E) गुणोत्तराच्या साधारणपणे २१ पट पातळीवर व्यवहार करत आहे. जी जानेवारी २०२६ मध्ये गाठलेल्या २२ पट पातळीपेक्षा किंचित कमी असून, त्याच्या पाच वर्षांच्या सरासरीच्या जवळपास आहे.
गोल्डमन सॅक्स रिसर्चच्या नोंदीनुसार, ३० मार्चपासून अमेरिकन शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक S&P 500 मध्ये सुमारे १३% ची जोरदार वाढ झाली आहे. एप्रिल २०२० नंतरची आणि त्यापूर्वी मार्च २००९ नंतरची ही सर्वात मोठी तेजी ठरली आहे. हा कल ऐतिहासिक सुधारणांच्या (करेक्शन्स) पद्धतीशी सुसंगत आहे.
