Donald Trump US Stock Market Investment Controversy: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल २०२५ मध्ये जगभरातील विविध देशांवर टॅरिफ लादत गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना जागतिक व्यापार व अर्थव्यवस्थेच्या भविष्याबद्दलच्या चिंतेत ढकलले होते. तर, त्यावेळी ट्रम्प स्वतःच निर्माण केलेल्या शेअर बाजारातील घसरणीचा फायदा घेत शेअर्सच्या खरेदीत मग्न होते.
त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या ‘लिबरेशन डे’ टॅरिफमुळे अमेरिकन शेअर बाजारातील निर्देशांक मंदीच्या उंबरठ्यावर पोहोचले होते आणि त्या घसरणीचा फायदा घेत गुंतवणूक वाढवणारे ट्रम्प हेच पहिले गुंतवणूकदार होते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक तपशीलांचे सीएनबीसीने केलेल्या विश्लेषणातून असे समोर आले आहे की, ८ एप्रिल २०२५ रोजी त्यांनी ३२७ वेळा शेअर्सची खरेदी केली. त्यांनी ही खरेदी अशा वेळी केली, जेव्हा त्यांनीच जाहीर केलेल्या टॅरिफबाबतच्या निर्णयांना ९० दिवसांची स्थगिती देण्याची घोषणा त्यांनी त्याच्या दुसऱ्याच दिवशी केली होती.
ट्रम्प यांनी सादर केलेल्या आर्थिक माहितीनुसार, त्यांनी ॲपल, ॲमेझॉन, अल्फाबेट, मायक्रोसॉफ्ट आणि एनव्हिडिया या कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले होते. हे सर्व शेअर्स ‘मॅग्निफिसेंट सेव्हन’ समूहाचा भाग आहेत, ज्यांना त्यांनीच केलेल्या टॅरिफवाढीच्या घोषणेनंतर मोठा फटका बसला होता. ही खरेदी १,००,००१ डॉलर ते २,५०,००० डॉलर दरम्यान होती.
८ एप्रिल रोजी, अमेरिकन शेअर बाजारातील एस अँड पी ५०० निर्देशांक मंदीच्या बाजाराच्या उंबरठ्यावर येऊन बंद झाला होता. याचा अर्थ त्याच्या उच्चांकावरून त्यात २० टक्क्यांची घसरण झाली होती. २ एप्रिल ते ८ एप्रिल या कालावधीतील केवळ चार सत्रांमध्ये या निर्देशांकात १२ टक्क्यांची घसरण झाली होती.
याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी, जेव्हा ‘फ्युचर्स’मध्ये विक्रीचा जोर कायम होता, तेव्हा ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल अकाउंटवर पोस्ट केले की, “खरेदी करण्यासाठी ही एक उत्तम वेळ आहे!!!” यानंतर काही तासांतच त्यांनी टॅरिफ वाढ काही काळासाठी स्थगित करण्याची घोषणा केली.

ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे केवळ ‘फ्युचर्स’ बाजारातच अचानक मोठी तेजी आली नाही, तर नियमित व्यवहारांदरम्यान एस अँड पी ५०० निर्देशांकातही ९.५% ची वाढ होऊन तो सावरला. ही या निर्देशांकाच्या इतिहासातील एका दिवसातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्या दिवसापासून या निर्देशांकात जवळपास ५०% ची वाढ झाली आहे.
सर्वांनाच याचा फायदा होत आहे
ट्रम्प यांचे आर्थिक तपशील समोर आल्यानंतर, त्यांनी शेअर बाजार आणि क्रिप्टो बाजारातून नफा मिळवण्यासाठी आपल्या राष्ट्राध्यक्ष पदाचा दुरोपयोग केल्याची टीका होऊ लागली आहे. या मुद्द्यावरून झालेल्या टीकेला उत्तर देताना, ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, शेअर बाजार वर जात असल्यामुळे सर्वांनाच याचा फायदा होत आहे.
