Eicher Motors Q1 Results : भारतात कितीही आधुनिक आणि सुपरफास्ट दुचाकी आल्या असल्या तरी ‘रॉयल एनफिल्ड’ बाइकची क्रेझ कायम असल्याचे पुन्हा एकदा आकडेवारीवरुन सिद्ध झाले आहे. दुचाकीचे उत्पादन करणारी कंपनी आयशर मोटर्स लिमिटेडने चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत दमदार आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. रॉयल एनफिल्ड आणि व्यावसायिक वाहनांच्या विक्रमी विक्रीच्या जोरावर कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा २१.४ टक्क्यांनी वाढून १,४६२.५१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
आयशर मोटर्स लिमिटेडच्या तिमाही निकालांची वैशिष्ट्ये
- एप्रिल-जून २०२६ या तिमाहीत कंपनीचा महसूल ३१.५ टक्क्यांनी वाढून ६,६३२.४२ कोटी रुपयांवर पोहोचला (गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ५,०४१.८४ कोटी रुपये होता).
- कंपनीचा निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या १,२०५.२२ कोटी रुपयांवरून वाढून १,४६२.५१ कोटी रुपये झाला.
- उत्पादन आणि विक्री वाढल्यामुळे एकूण खर्च ४,०५२.०२ कोटींवरून ५,३४१ कोटी रुपये झाला आहे.
रॉयल एनफिल्डची ‘ऑल टाईम हाय’ विक्री
आयशर मोटर्सच्या या शानदार कामगिरीचा मुख्य आधार रॉयल एनफिल्ड ठरली आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीने ३,३२,९४० बाईक्सची विक्रमी विक्री केली, जी आतापर्यंतची कोणत्याही एका तिमाहीतील सर्वोच्च विक्री आहे. गेल्या वर्षाच्या याच कालावधीतील २,६१,३२६ युनिट्सच्या तुलनेत यात २७ टक्क्यांची दणदणीत वाढ झाली आहे.
आंध्र प्रदेशात २५०० कोटींचा नवा प्लांट
रॉयल एनफिल्डच्या मोटरसायकल्सची वेगाने वाढणारी मागणी लक्षात घेता कंपनीने उत्पादन क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेश राज्यातील टाडा येथे तब्बल २५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करुन नवीन प्रकल्प उभारला जाणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने पहिल्या टप्प्यासाठी १,२२५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यामुळे दरवर्षी ४.५ लाख अतिरिक्त दुचाकी बनवण्याची क्षमता निर्माण होईल. हा प्रकल्प २०३० पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
व्यावसायिक वाहनांच्या विक्रीतही विक्रम
आयशर मोटर्स आणि व्होल्वो ग्रुपचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘व्हीई कमर्शियल व्हेइकल्स’ने देखील आपली सर्वोत्तम पहिली तिमाही नोंदवली. कंपनीने या तिमाहीत २४,८१५ व्यावसायिक वाहनांची विक्री केली, जी गेल्या वर्षी २१,६१० युनिट्स होती.
