कौस्तुभ जोशी
El Nino Impact On Indian Economy : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी मागच्या आठवड्यात केलेली दोन विधाने अर्थव्यवहार समजून घेण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्रातील मराठवाड्यातील प्रमुख सर्व जिल्ह्यांसह सगळीकडेच दुष्काळाचे संकट गंभीर झाले आहे व त्या दृष्टिकोनातून शासनातर्फे दुष्काळ झळा सहन करण्यासाठीच्या उपाययोजना राबवण्यास सुरुवात होईल. दुसरीकडे आशियासह जगातील प्रमुख देशांनी अन्य धान्याच्या टंचाईसाठी सज्ज व्हायला हवे असे वक्तव्य एस.जयशंकर यांनी केले. या दोन्हीतून जो समान दुवा आपल्याला सापडतो तो म्हणजे ‘एल निनो’ परिस्थितीने आता आपले रंग दाखवण्यात सुरुवात केली आहे.
पाऊस कमी पडणे हा प्रश्न भारतासारख्या देशात खूपच भयानक का आहे? याचे उत्तर पावसावर अवलंबून असलेले कृषी क्षेत्र भारतात अजूनही सर्वाधिक प्रमाणात होते. बारा महिने जलसिंचन उपलब्ध असणे अगदी थोड्या क्षेत्रांमध्ये शक्य झाले आहे. यामुळेच पावसाने ओढ दिली तर ताबडतोब उत्पादनात घट होऊन अन्नटंचाईचा सामना करावा लागतो. भारताच्या संदर्भात महाराष्ट्र आणि आशिया खंडाच्या संदर्भात भारत मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पादने पिकवणारा देश आणि विकत घेणारही देश आहे. अर्थातच त्यामुळे एकूण महागाईच्या संदर्भात ताटातील महागाई सर्वाधिक वेदनादायी ठरते.
‘जीडीपी’ वाढतोच आहे, पण तरीही…
एकीकडे शेतीचे हे असे चित्र असताना दुसरीकडे मात्र औद्योगिक उत्पादनात सतत वाढ झालेली दिसत आहे. सप्टेंबर महिन्याचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) यामधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा आकडा घसघशीत आहे, हे पाहून थोडेसे मन सुखावेल तोच शेअर बाजारातील लालेलाल रंग समोर येतो. सप्टेंबर अखेरीस निफ्टी जवळपास दहा टक्के घसरला आहे. परदेशी गुंतवणूकदारांचे भारतीय बाजारातून शेअर विकून बाहेर जाण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. म्हणजे एकीकडे दरी आणि दुसरीकडे निसरडा रस्ता अशी अवस्था गुंतवणूकदारांची झालेली दिसते.
शेअर बाजारात जरी कंपन्यांच्या नफ्या-तोट्यावर चढ-उतार होत असले तरीही त्याला प्रभावित करणारे सर्व घटक विचारात घेतल्याशिवाय बाजार रंग उलगडता येणार नाहीत.
महागाई वरचा उतारा कोणता?
महागाई निर्माण होण्याची दोन प्रमुख कारणे असतात. मागणीतील वाढ किंवा पुरवठ्यातील घट म्हणजेच टंचाई. अर्थव्यवस्था जोमदारपणे वाढू लागली आणि सर्वांच्याच हाती पैसा खेळू लागला तर वस्तूंची आणि सेवांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. मात्र तेवढ्या वस्तूंचा पुरवठा होत नाही. अशावेळी जी महागाई तयार होते ती नियंत्रणात आणणे रिझर्व्ह बँकेच्या आवाक्यातले काम असते. दुसरीकडे खनिज तेलाचे भाव वाढल्याने इंधनाच्या दरात झालेली वाढ, आयात परदेशी वस्तूंच्या भावात वाढ झाल्याने निर्माण झालेला वाढीव खर्च हे निस्तरता न येणाऱ्या महागाईचे लक्षण आहे. विशेषतः अन्नधान्याच्या बाबतीत महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार परदेशातून मिळेल त्या दराने अन्नधान्य आयात करून जनतेच्या फायद्याचा निर्णय घेते. याचे दोन परिणाम होतात, पहिला वाढत्या आयातीमुळे खर्ची पडणारे डॉलर आणि दुसरा परिणाम परदेशातून स्वस्तातील कृषी उत्पादने आयात झाली की, देशातल्या बाजारांमध्ये त्याचे दर पडतात. म्हणजे पुन्हा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येते. आता कांद्याची भाव वाढ टाळण्यासाठी सरकारने कांदा आयात केला तर शेतकऱ्यांच्या हक्काचा घास हिरावला जाणार आहे.
कृषी अर्थव्यवस्था बाधित झाल्यामुळे देशातील जवळपास ४० टक्के लोकांच्या पैसे खर्च करण्याच्या क्षमतेवर संकट निर्माण होते. शेतमजूर, शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू, अवजारे, खते, रसायने यांची विक्री करणारे, तयार वस्तू बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी असलेल्या पुरवठा साखळीतील सर्व घटक अशी मोठी यंत्रणाच शेतीमुळे जिवंत आहे. विचार करायचा झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था अजूनही शेतीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असताना जर ‘एल निनो’सारखा प्रभाव वाढला तर ते एक अस्मानी संकटच आहे. अशावेळी महागाईचा सामना करण्यासाठी व्याजदर वाढवून कोणताही फायदा होणार नाही उलट व्याजदर वाढवल्यावर कर्जाचे दर वाढतील आणि त्या क्षेत्रांवरही त्याचा परिणाम होईल. महागाईचा सामाजिक दबाव टाळण्यासाठी सरकारला जनप्रिय योजना आणाव्या लागतील (म्हणजेच कर्जमाफी, पुढच्या वर्षीच्या शेतीसाठी लागणारे कर्ज स्वस्त दरात देणे, विज बिल माफी किंवा थेट खात्यावर पैसे देणे) या सगळ्याचा थेट परिणाम सरकारच्या तिजोरीवर पडतो. ‘जीडीपी’तील वाढ भक्कम दिसत असली तरी त्याचा जनतेवर होणारा परिणाम कुठेतरी कंपन्यांच्या विक्री आणि नफ्यावर दिसणारच आहे.
गुंतवत रहा! किती वर्ष?
म्युच्यअल फंड घराण्यांकडून आणि निधी व्यवस्थपकाकडून सतत ‘स्टे इन्वेस्टेड’ म्हणजेच गुंतवणूक कायम ठेवा, असा सल्ला दिला जात असला तरीही गुंतवणूकदारांच्या संयमाची प्रतीक्षा बघणारा काळ सुरू आहे. २०२० या वर्षातील मंदीनंतर बाजारांनी जशी भरारी घेतली तशी पुन्हा घेणार आहेत फक्त गुंतवणूकदारांनी धीर सोडू नये या वाक्याला काही व्यावहारिक मर्यादा आहेत. ज्यांनी दहा वर्षांपूर्वी गुंतवणूक केली होती व आता पैशाची गरज लागणार आहे त्यांनाही घटत्या दराने पैसे मिळणार आहेत. ज्यांनी मागच्या तीन वर्षांपासून गुंतवणूक सुरू ठेवली आहे त्यांना मानसिक संतुलन ठेवून बाजारामध्ये पाय रोवून उभे राहावे लागणार आहे. एकीकडे शेअरमध्ये फारसे यश नाही तर दुसरीकडे आठवड्याला नवनवीन ‘आयपीओ’ बाजारात येत आहेत. अशावेळी स्थितप्रज्ञपणा किती दिवस दाखवायचा हा प्रश्न तयार झाला आहे.
मंदी कधी येईल?
समाज माध्यमावरील ‘इन्फ्लुएन्सर्सकडून’ आणि एकूणच लोकांना घाबरवण्यात आनंद मानणाऱ्या अनेकांकडून मंदी येणार आहे व ती पुढच्या तीन-चार महिन्यातच येईल असे सतत म्हटले जाते. प्रत्यक्षात मंदी आली की ती येताना समजत नाही तर मंदीच्या तडाख्यात आपण सापडल्यावर ते लक्षात येते. गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओ संदर्भातला ‘शंभर वजा वय’ हा फॉर्म्युला लक्षात असल्याची खात्री करून सरकारी कर्जरोखे, पोस्टातील बचत योजना, एनसीडी, डेट म्युच्युअल फंड यांच्यातील आपली गुंतवणूक कायम ठेवावी हेच यानिमित्ताने लक्षात असू द्या.
