Share Market Loss: अलिकडे शेअर बाजारातून जास्त पैसे कमावण्याच्या मोहात किरकोळ गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात नुकसान करून घेत असल्याच्या बातम्या सातत्याने वाचायला मिळतात. अशा आता शेअर बाजारातील गुंतवणूकीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा एक प्रकार समोर आला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर एका युजरने दावा केला आहे की, त्यांच्या कुटुंबाने एकाच शेअरमध्ये केलेली सुमारे ७५ लाख रुपयांची गुंतवणूक आता कमी होऊन साधारणपणे ३० लाख रुपयांवर आली आहे. युजरने या पोस्टमध्ये इतरांकडे या परिस्थिती कोणते पाऊल उचलावे याबाबत मदतही मागितली आहे.
या पोस्टमध्ये संबंधित रेडिट युजरने सांगितले की, त्यांच्या वडिलांनी २०१३ च्या सुमारास जास्त माहिती नसतानाही शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती आणि ते प्रामुख्याने एका नातेवाईकाच्या सल्ल्यावर अवलंबून होते. त्या सल्ल्यानुसार, विविध क्षेत्रांतील शेअर्सचा समावेश असलेला ‘डायव्हर्सिफाइड पोर्टफोलिओ’ तयार करण्याऐवजी वडिलांनी केवळ एकाच कंपनीचा शेअर खरेदी करणे सुरू ठेवले.
“२०१३ ते २०२० या काळात, जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे बचत जमा व्हायची, तेव्हा गुंतवणुकीत विविधता आणण्याऐवजी ते त्याच शेअरमध्ये अधिक गुंतवणूक करत असत”, असे त्या युजरने लिहिले आहे.
पोस्टनुसार, ही गुंतवणूक तीन डीमॅट खात्यांमध्ये विभागलेली होती. आईच्या खात्यात सुमारे ३० लाख रुपये, काकांच्या खात्यात अंदाजे २० लाख रुपये आणि वडिलांच्या खात्यात जवळपास २५ लाख रुपये. अशा प्रकारे कुटुंबाची एकूण गुंतवणूक सुमारे ७५ लाख रुपये इतकी होती.
“आज त्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य साधारणपणे ३० लाख रुपये आहे”, असे त्या रेडिट युजरने सांगितले. म्हणजेच त्यांचे आतापर्यंत एकूण ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
“यात माझ्या पालकांच्या आयुष्यभराची जवळपास सर्वच बचत गुंतलेली आहे आणि आमच्या कुटुंबासाठी ही परिस्थिती अत्यंत कठीण ठरत आहे. माझे वडील खूप निराश आहेत आणि जे काही घडले, त्यासाठी ते स्वतःलाच जबाबदार मानत आहेत”, असे त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अनुभवी गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सकडून मार्गदर्शन मिळवण्याच्या उद्देशाने, संबंधित युजरने विचारले की अशा परिस्थितीतून सावरणे शक्य आहे का, तसेच तो शेअर तसाच होल्ड करणे योग्य ठरेल की उरलेली भांडवली रक्कम इतरत्र गुंतवणे हा अधिक चांगला पर्याय असेल.
जर तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये…
या पोस्टवर कमेंट करताना एका युजरने म्हटले, “जर तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये चढलात, तर तुम्ही प्रवास पुढे चालू ठेवाल की पुढच्या शक्य थांब्यावर खाली उतराल? कोणत्याही व्यवसायात काहीही घडू शकते, परंतु अनेक धोक्याचे संकेत असलेल्या कंपनीत गुंतवणूक करणे कधीही योग्य नसते. त्यामुळे मी त्यातून बाहेर पडेन.”
