मुंबई : देशांतर्गत शेअर बाजारातून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (एफआयआय) निधी बाहेर पडण्याचा वेग २०२६ मध्ये आणखी वाढला असून, दुय्यम बाजारातील त्यांची विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाली आहे. यंदा आतापर्यंत एफआयआयंकडून सरासरी प्रत्येक तासाला सुमारे ४०० कोटी रुपयांची समभागांची विक्री करण्यात आल्याचे बाजार आकडेवारीवरून दिसून येते.
एनएसडीएल आणि शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, २०२६ च्या सुरुवातीपासून मे महिन्याच्या प्रारंभीपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय दुय्यम बाजारातून दोन लाख कोटी रुपयांहून अधिक निधी काढून घेतला आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण २०२५ वर्षभरात एफआयआयंची विक्री सुमारे २.४ लाख कोटी रुपये होती. त्यामुळे यंदाच्या पहिल्या काही महिन्यांतच विक्रीचा वेग लक्षणीय वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
चालू वर्ष २०२६ मध्ये परकीय गुंतवणूकदारांच्या शेअर्स विक्रीचा वेग तब्बल ४०० कोटी रुपये प्रति ट्रेडिंग तास इतका प्रचंड राहिला आहे. हा वेग संपूर्ण २०२५ वर्षातील सरासरी विक्रीच्या (१६१ कोटी रुपये प्रति तास) तुलनेत दुप्पट आहे. गुंतवणूकदारांनी वर्ष २०२६ च्या अवघ्या ९६ ट्रेडिंग सत्रांमध्ये भारतीय दुय्यम बाजारात २.५४ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याचे शेअर्स विकले आहेत. विशेष म्हणजे, वर्ष २०२५ मधील एकूण विक्री २.४ लाख कोटी रुपये होती; म्हणजेच यंदा केवळ ५ महिन्यांतच गेल्या संपूर्ण वर्षाचा आकडा पार झाला असून अद्याप वर्षाचे ७ महिने बाकी आहेत.
चालू वर्षात मार्च महिन्यापासून परकीय गुंतवणूकदारांच्या विक्रीचा जोर कमालीचा वाढला. एकट्या मार्च महिन्यात त्यांनी तब्बल १.२७ लाख कोटी रुपयांचे शेअर विकून विक्रमी निर्गमन केले. त्यानंतर एप्रिलमध्ये सुमारे ५०,८०० कोटी आणि मे महिन्यात ५४,००० कोटी रुपयांची विक्री नोंदवण्यात आली. अमेरिका-इराणमधील संघर्षामुळे खनिज तेलाचे दर प्रतिपिंप ९७ डॉलरच्या पार गेल्याने भारताच्या आर्थिक विकासावर आणि कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याच्या भीतीने ही विक्री वाढली आहे.
बाजारतज्ज्ञांच्या मते, भारतीय समभागांचे तुलनेने उच्च मूल्यांकन, कॉर्पोरेट नफावाढीतील मंदी, कृत्रिम प्रज्ञा (एआय) क्षेत्रातील जागतिक गुंतवणुकीचे बदलते प्रवाह आणि अमेरिका-इराण संघर्षामुळे वाढलेली भू-राजकीय अनिश्चितता ही या विक्रीमागील प्रमुख कारणे आहेत. वाढत्या खनिज तेलाच्या किमती आणि रुपयावरील दबावामुळेही परदेशी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. विशेषतः माहिती-तंत्रज्ञान आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केली आहे. यामुळे भारतीय बाजारातील परदेशी मालकीचा हिस्सा एप्रिलमध्ये तब्बल १५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
तथापि, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) मोठ्या प्रमाणावर खरेदी करून बाजाराला आधार दिला आहे. २०२६ मध्ये आतापर्यंत डीआयआयंकडून दोन लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली असून, त्यामुळे एफआयआय विक्रीचा परिणाम काही प्रमाणात मर्यादित राहिला आहे.
गुंतवणुकीचा ओघ एआयकडे; भारताला फटका
बाजार विश्लेषकांच्या मते, जागतिक पातळीवरील बड्या फंडांनी आता आपला मोर्चा कृत्रिम प्रज्ञा (एआय) क्षेत्राशी संबंधित कंपन्यांकडे वळवला आहे. अमेरिका, तैवान आणि दक्षिण कोरिया या देशांमधील बाजारात ‘एआय’ तंत्रज्ञानाशी निगडित कंपन्यांचे वर्चस्व असल्याने परकीय निधी तिथे वळवला जात आहे. याउलट, भारतीय शेअर बाजारात थेट एआय क्षेत्राशी संबंधित मोठ्या पर्यायांचा अभाव असल्याने विदेशी गुंतवणूकदार भारतातून पैसे काढून घेत आहेत.
आयपीओ बाजारात चैतन्य
दुय्यम बाजारात प्रचंड विक्रीचा सपाटा लावलेला असताना, परकीय गुंतवणूकदारांनी नव्याने येणाऱ्या कंपन्यांच्या आयपीओमध्ये म्हणजेच प्राथमिक समभाग विक्रीत मात्र रस दाखवला आहे. त्यांनी २०२६ मध्ये आतापर्यंत प्राथमिक बाजारात १५,४७३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, सध्याच्या बाजार अस्थिरतेमुळे अनेक कंपन्यांनी आपले आयपीओ लांबणीवर टाकल्याने या मार्गावरील गुंतवणुकीलाही मर्यादा आल्या आहेत.
ठळक मुद्दे
- विक्रीचा नवा विक्रम : २०२६ मध्ये परकीय गुंतवणूकदारांकडून प्रति ट्रेडिंग तास ४०० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री.
- गेल्या वर्षाचा विक्रम मोडला : अवघ्या ५ महिन्यांत २.५४ लाख कोटी रुपयांचा निधी बाहेर; २०२५ मधील एकूण विक्री २.४ लाख कोटी होती.
- क्रूड ऑईलचा फटका : मध्यपूर्वेतील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या दरामुळे विदेशी फंड सावध.
- एआय (AI) बाजारांकडे ओढा : अमेरिका, तैवानकडे निधी वळवल्याने भारतीय माहिती-तंत्रज्ञान (IT) आणि बँकिंग समभागांवर दबाव.
- आयपीओ बाजारात खरेदी : दुय्यम बाजारात विक्री असली तरी प्राथमिक बाजारात १५,४७३ कोटींची गुंतवणूक.
