South Korea Stock Market Crash : जागतिक शेअर बाजारातून अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील रोजगाराच्या मजबूत आकडेवारीमुळे फेडरल रिझर्व्ह या वर्षी व्याजदरात वाढ करेल, या भीतीने जागतिक बाजारात मोठी घसरण सुरू झाली आहे. याचा सर्वात मोठा फटका दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराला बसला. सोमवारच्या सुरुवातीच्या सत्रातच तिथला प्रमुख बेंचमार्क इंडेक्स ‘कोस्पी’ तब्बल ९ टक्क्यांनी कोसळला. बाजारातील पडझड रोखण्यासाठी अखेर एक्सचेंजला ‘सर्किट ब्रेकर’चा वापर करावा लागला, ज्यामुळे बाजार काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाला होता. गेल्याच आठवड्यात दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराने भारतीय शेअर बाजाराला मागे टाकले होते.

काही मिनिटांत एआय आणि टेक शेअर्स धडाम!

दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराने गेल्या काही महिन्यात अभूतपूर्व झेप घेतली आहे. विशेष करुन तंत्रज्ञान आणि आर्टिफिशिलय इंटेलिजन्स क्षेत्रातील प्रगतीमुळे भारताला त्यांनी मागे टाकले. मात्र, आता याच क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाल्याने दाणादाण उडाली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात ‘कोस्पी’ निर्देशांक ८.८ टक्क्यांपर्यंत खाली आल्यामुळे दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराला मोठा हादरा बसला. विशेषतः सेमीकंडक्टर क्षेत्रातील दिग्गज कंपन्या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आणि एसके हायनिक्स यांचे शेअर्स प्रत्येकी १० टक्क्यांहून अधिक घसरले. एआय बबल फुटणार का? यावरुन चर्चा रंगू ल

३ महिन्यात तिसऱ्यांदा सर्किट ब्रेकर लावण्याची वेळ

तब्बल तीन महिन्यांनंतर पहिल्यांदाच २० मिनिटांसाठी ट्रेडिंग पूर्णपणे थांबवण्यात आले. दक्षिण कोरियाच्या बाजाराच्या इतिहासात सर्किट ब्रेकर लागण्याची ही केवळ नववी वेळ आहे, तर या चालू वर्षातील ही तिसरी घटना आहे. यानंतर बाजार पुन्हा सुरू झाल्यावर घसरण नियंत्रणात आणण्यासाठी ‘साईडकार’ नावाचे दुसरे ट्रेडिंग नियंत्रण लागू करण्यात आले, ज्यामुळे कोस्पीची घसरण काहीशी कमी होऊन ४.६ टक्क्यांवर आली.

जागतिक शेअर बाजारात घसरण का झाली?

या जागतिक भूकंपाचं मूळ अमेरिकन बाजारात आहेत. शुक्रवारी अमेरिकेतील मजबूत रोजगार डेटा समोर आला. यामुळे व्याजदरात कोणतीही कपात होण्याची आशा संपुष्टात आली, ज्यामुळे अमेरिकेचा तंत्रज्ञान केंद्रित ‘नॅस्डॅक’ निर्देशांक ४.२ टक्क्यांनी घसरला होता. तसेच फिलाडेल्फिया सेमीकंडक्टर इंडेक्स १० टक्क्यांनी तर आयशेअर्स एमएससीआय साऊथ कोरिया ईटीएफ १४ टक्क्यांनी कोसळला. ‘किवूम सिक्युरिटीज’च्या विश्लेषकांच्या मते, अमेरिकेच्या रोजगाराच्या अनपेक्षित आकडेवारीमुळे बाँड यील्ड वाढला. सेमीकंडक्टर शेअर्सच्या अतिरेकी वाढीमुळे आधीच ओव्हरहीट झालेल्या बाजाराला या आकडेवारीने नफा वसुलीचे एक निमित्त मिळवून दिले आहे. बाजारातील ही अस्थिरता अपरिहार्य असली तरी, अलीकडच्या करेक्शनमुळे व्हॅल्यूएशनचे दडपण कमी झाले असल्याने आणि सेमीकंडक्टर कंपन्यांची कमाई मजबूत असल्याने ही घसरण अनेक दिवस टिकणार नाही, असा अंदाजही वर्तवला जात आहे.

दक्षिण कोरियाला सर्वाधिक फटका का?

या मोठ्या पडझडीदरम्यान परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी दक्षिण कोरियाच्या बाजारातून सुमारे २०० अब्ज वॉन म्हणजेच १२ कोटी ८८ लाख डॉलर्सची शेअर्स विक्री केली असून, त्यांच्या सलग विक्रीचा हा २१ वा दिवस ठरला आहे. या सर्वांचा फटका बाजाराला बसला. या सोमवारच्या मोठ्या घसरणीनंतरही कोस्पी निर्देशांक या वर्षात आतापर्यंत ८३ टक्क्यांनी वाढलेला आहे. यापूर्वी २०२५ मध्ये या निर्देशांकाने तब्बल ७६ टक्क्यांची ऐतिहासिक वाढ नोंदवली होती, जी १९९९ नंतरची त्याची सर्वात मोठी वार्षिक कामगिरी होती आणि गेल्या वर्षीच्या प्रमुख जागतिक बाजारांमध्ये दक्षिण कोरिया हा सर्वोत्तम कामगिरी करणारा बाजार ठरला होता.

भारतावर काय परिणाम होणार?

जागतिक बाजारातील या मोठ्या घडामोडींचा परिणाम आगामी काळात भारतीय शेअर बाजारातील आयटी आणि टेक शेअर्सवर होण्याची शक्यता आहे. एआयच्या उगमानंतर भारतीय आयटी कंपन्यांचे शेअर्स सातत्याने घसरत आहे. टीसीएस, विप्रो आणि इन्फोसिससह अनेक दिग्गज कंपन्यांचे बाजार भांडवलात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.