Warren Buffett Berkshire Hathaway : जगातील दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे यांनी निवृत्तीपूर्वी मोठ्या प्रमाणात शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेतली होती. परिणामी बफे यांच्या बर्कशायर हॅथवे कंपनीकडे रोख स्वरुपात तब्बल ३८०.२ अब्ज डॉलर्स पडून होते. कंपनीचे नवीन सीईओ ग्रेग एबेल यांनी वॉरन बफे यांच्या पारंपारिक धोरणाला छेद देत आता वेगळा निर्णय घेतला आहे. बर्कशायर हॅथवेने गुगलची मूळ कंपनी ‘अल्फाबेट’मध्ये १० अब्ज डॉलर्स (सुमारे ८३,००० कोटी रुपये) गुंतवण्याचा ऐतिहासिक करार केला आहे.
दोन दिवसांत १६.८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!
या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी २०२६ मध्ये वॉरन बफे यांच्यानंतर सीईओ पद स्वीकारलेल्या ग्रेग एबेल यांच्यासमोर बर्कशायरकडे पडून असलेला अवाढव्य निधी गुंतवणुकीचे मोठे आव्हान होतं. एबेल यांनी केवळ दोन दिवसांत तब्बल १६.८ अब्ज डॉलर्सची अवाढव्य गुंतवणूक करून सर्वांनाच चकित केले आहे. गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटमध्ये ८० अब्ज डॉलर्सच्या इक्विटी फंडरेझिंगचा भाग म्हणून बर्कशायर १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक खासगी प्लेसमेंटद्वारे करणार आहे. याशिवाय, अमेरिकेतील मोठी गृहनिर्माण कंपनी ‘टेलर मॉरिसन होम कॉर्प’ खरेदी करण्यासाठी बर्कशायरने ६.८ अब्ज डॉलर्सचा करार केला आहे.
वॉरन बफे यांची कबुली
वॉरन बफे गुंतवणुकीसाठी कायम शाश्वत उद्योग शोधत होते. ज्याला कुठल्याही परिस्थितीत मरण नाही. याच कारणामुळे तंत्रज्ञान क्षेत्रापासून ते कायम दूर राहिले. मात्र, २०१९ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वॉरन बफे आणि त्यांचे दिवंगत भागीदार चार्ली मुंगर यांनी गुगलमध्ये आधी गुंतवणूक न केल्याबद्दल जाहीर खंत व्यक्त केली होती. गुगलचे अॅडव्हर्टायझिंग मॉडेल बर्कशायरच्या ‘गायको’ कार इन्शुरन्ससारखेच आहे, हे ओळखण्यात “आम्ही मोठी चूक केली”, अशी कबुली बफे यांनी दिली होती.
गुंतवणूकदारांचा दबाव
३१ मार्च २०२६ पर्यंत बर्कशायर हॅथवेकडे तब्बल ३८०.२ अब्ज डॉलर्सचा प्रचंड मोठा रोख परतावा पडून होता. इतका मोठा पैसा पडून असल्यामुळे कंपनीच्या शेअर्सच्या किमतीवर दबाव वाढत होता. मे २०२५ मधील सर्वोच्च पातळीवरून बर्कशायरचे शेअर्स १३% घसरले होते. याच पार्श्वभूमीवर नव्या दमाच्या ग्रेग एबेल यांनी बफे यांच्या पारंपरिक पद्धतीला बाजूला सारत धाडसी गुंतवणूक सुरू केली आहे.
अमेरिकेतील हाऊसिंग क्षेत्रात मोठी पकड
बर्कशायर कंपनीचे सर्वाधिक उत्पन्न अमेरिकेतील गृहनिर्माण क्षेत्रातून येते. नुकतीच ६.८ अब्ज डॉलर्सला खरेदी केलेली ‘टेलर मॉरिसन’ ही कंपनी अमेरिकेतील १२ राज्यांमध्ये गृहनिर्माण क्षेत्रात कार्यरत आहे. बर्कशायरकडे आधीच क्लेटन होम्ससह विटा, रंग आणि इन्सुलेशन बनवणाऱ्या अनेक हाऊसिंग कंपन्या आहेत. या नवीन खरेदीमुळे अमेरिकेच्या रिअल इस्टेट बाजारावर बर्कशायरची पकड अधिक मजबूत होणार आहे.
