HFCL Share Price surges to a record high today: सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून येत असून, यात प्रमुख निर्देशांक निफ्टी ५० आणि सेन्सेक्समध्ये जोरदार विक्री सुरू आहे.

दुसरीकडे व्यापक बाजारात मंदीचे वातावरण असूनही, दूरसंचार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील निवडक शेअर्समध्ये खरेदीचा उत्साह मात्र कायम राहिला. या क्षेत्रात, एचएफसीएल (HFCL) या कंपनीचा शेअर चर्चेत राहिला, कारण या शेअरने आपली जोरदार तेजीची वाटचाल आजी सुरूच ठेवली आहे. आज सकाळी ११:०० वा. पर्यंत एचएफसीएलच्या शेअरच्या किमतीत ९.२७ टक्क्यांची वाढ झाली असून तो आता १५१.८० या ५२ आठवड्यांच्या (१ वर्ष) उच्चांकावर पोहचला आहे.

HFCL शेअरची कामगिरी

एचएफसीएलच्या शेअर्सनी विविध कालावधींमध्ये दमदार परतावा दिला आहे आणि सध्या हा शेअर त्याच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीच्या (all-time high) जवळ व्यवहार करत आहे. गेल्या पाच आठवड्यांत या शेअरमध्ये जवळपास ११० टक्क्यांची तेजी दिसून आली असून, त्याची किंमत साधारण ७१ रुपयांवरून १४९ रुपयांच्या पातळीपर्यंत वधारली आहे. गेल्या एका महिन्याच्या कालावधीत, या शेअरने ७५.१४ टक्के वाढ नोंदवली आहे, तर गेल्या सहा महिन्यांत त्यात ९२.३६ टक्क्यांची वाढ झाली आहे. एका वर्षाच्या कालावधीचा विचार करता, एचएफसीएलच्या शेअरने ८३.९१ टक्के परतावा दिला आहे.

११ मे २०२६ रोजी या शेअरने १५१.८० रुपयांची नवीन ५२-आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठली, तर २७ जानेवारी २०२६ रोजी नोंदवली गेलेली ५९.८२ रुपयांची पातळी ही त्याची ५२-आठवड्यांची नीचांकी पातळी आहे.

एचएफसीएल बद्दल

एचएफसीएल ही एक भारतीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार पायाभूत सुविधा कंपनी आहे, जी ऑप्टिकल फायबर केबल्स, ऑप्टिकल फायबर आणि दूरसंचार नेटवर्किंग उपकरणांच्या उत्पादनामध्ये कार्यरत आहे. ही कंपनी दूरसंचार ऑपरेटर, ब्रॉडबँड सेवा पुरवठादार, संरक्षण दलांची दूरसंचार नेटवर्क आणि रेल्वेच्या दूरसंचार पायाभूत सुविधांसाठी दळणवळणाशी संबंधित उत्पादने आणि उपाय (Solutions) पुरवते.

कंपनी टर्नकी नेटवर्क इंटिग्रेशन प्रकल्प देखील हाती घेते आणि देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये संपूर्ण कनेक्टिव्हिटी सोल्यूशन्स सेवा पुरवते करते. एचएफसीएल दूरसंचार पायाभूत सुविधा, ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी, निगराणी प्रणाली आणि संरक्षण तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.