IPO Market Fund Raising H1 FY27 : देशातील प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) बाजाराने आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या सहामाहीत निधी उभारणीचा नवा विक्रम नोंदविला आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत ७१ कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून ८४,४०० कोटी रुपयांचे भांडवल उभारले. मागील वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत त्यात ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. ग्रँट थॉर्न्टन भारतच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या सहामाहीत आयपीओच्या माध्यमातून ६४,९०० कोटी रुपयांची निधी उभारणी झाली होती. यंदा त्यात १९,५०० कोटी रुपयांची भर पडली. विशेष म्हणजे, पहिल्या सहामाहीतील एकूण निधी उभारणीपैकी जवळपास ९४ टक्के भांडवल जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत उभारण्यात आले. या कालावधीत आयपीओ बाजारात उत्साहाचे वातावरण राहिले. सप्टेंबर हा सर्वाधिक व्यग्र महिना ठरला. या एकाच महिन्यात ३२ कंपन्यांनी समभाग विक्रीतून ४०,४०० कोटी रुपये उभारले. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत एकूण ७१ कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्या. मागील वर्षातील याच कालावधीत ५५ कंपन्यांचे समभाग सूचिबद्ध झाले होते.
सूचिबद्धतेनंतरच्या परताव्यात सुधारणा
आयपीओला मिळणारा प्रतिसाद आणि सूचिबद्धतेनंतरचा परतावा यांतही सुधारणा झाली. आयपीओच्या सूचिबद्धतेच्या दिवशी मिळणारा सरासरी परतावा मागील वर्षातील १० टक्क्यांवरून यंदा १८ टक्क्यांवर पोहोचला. किरकोळ गुंतवणूकदारांकडून आयपीओला मिळणारा सरासरी प्रतिसाद २५ पटींवरून २८ पटींपर्यंत वाढला आहे.
क्षेत्रनिहाय निधी उभारणी कशी?
क्षेत्रनिहाय विचार करता, एकूण निधी उभारणीत वित्तीय सेवा क्षेत्राचा सर्वाधिक ४३ टक्के वाटा राहिला. तर भांडवली वस्तू क्षेत्राने आयपीओच्या संख्येत आघाडी घेतली. या क्षेत्रातील १५ कंपन्यांनी समभाग विक्री केली. शेअर बाजारातील आयपीओच्या वाढत्या संख्येला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (डीआयआय) मोठा आधार मिळाला. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीत डीआयआयनी शेअर बाजारात १.६९ लाख कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली. याच कालावधीत परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) १३,९०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
विशेष म्हणजे, सप्टेंबरमध्ये निफ्टी ५० या प्रमुख निर्देशांकात ५.७ टक्क्यांची घसरण झाली होती. तरीही देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या भक्कम खरेदीमुळे आयपीओच्या माध्यमातून बाजारात आलेला अतिरिक्त समभाग पुरवठा पचविणे शक्य झाले.
आयपीओची मोठी प्रतीक्षा यादी
आगामी काळातही आयपीओ बाजारात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या सहामाहीत १०० मुख्य मंचावरील (मेनबोर्ड) कंपन्या आणि १५९ लघू व मध्यम उद्योग क्षेत्रातील (एसएमई) कंपन्यांनी आयपीओसाठी मसुदा प्रस्ताव दाखल केला आहे.
मात्र, आयपीओसाठी दाखल झालेल्या अर्जांची मोठी संख्या म्हणजे प्रत्यक्षात तेवढे आयपीओ बाजारात येतीलच असे नाही, असा इशाराही अहवालात देण्यात आला आहे.
