Donald Trump Davos Statement Impact On Share Market: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी बळाचा वापर करण्याची शक्यता फेटाळून लावल्यानंतर आणि युरोपीय मित्र राष्ट्रांवर नवीन टॅरिफ लादण्याची योजना रद्द केल्यामुळे बाजारातील भीती कमी झाली आहे. त्यामुळे जागतिक शेअर बाजारांमध्ये आलेल्या तेजीप्रमाणेच गुरुवारी भारतातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीतही तेजी पाहायला मिळत आहे.

आज सेन्सेक्स सुमारे ३९७.७३ अंशांच्या वाढीसह ८२,३०७.३७ अंशांवर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १३२.४० अंशांच्या वाढीसह २५,२८९.९० वर बंद झाला.

दरम्यान जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे आणि वाढत्या भू-राजकीय चिंतेमुळे, भारतातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये काल (बुधवारी) मोठी घसरण पाहायला मिळाली होती.

ग्रीनलँडबाबत ट्रम्प यांची सौम्य भूमिका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी ग्रीनलँडबाबतच्या भूमिकेवरून अनेक देशांवर शुल्क लावण्याची धमकी मागे घेतली आणि सांगितले की त्यांनी ग्रीनलँडच्या भविष्याबाबत नाटोसोबत एका कराराची रूपरेषा निश्चित केली आहे. “या कराराच्या आधारावर, मी १ फेब्रुवारीपासून लागू होणारे टॅरिफ लादणार नाही”, असे ट्रम्प यांनी दावोसमध्ये नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांच्या भेटीनंतर ट्रुथ सोशलवर लिहिले.

जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक रणनीतिकार डॉ. व्ही. के. विजयकुमार म्हणाले, “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बळाचा वापर करून ग्रीनलँड ताब्यात घेण्याची धमकी मागे घेतली आहे. त्याऐवजी, काल दावोसमध्ये ते म्हणाले की, त्यांनी ग्रीनलँडबाबत भविष्यातील कराराची एक चौकट निश्चित केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमेरिका युरोपवर टॅरिफ लादण्यापासून परावृत्त होईल, या संदेशामुळे अमेरिका-युरोप व्यापार युद्धाचा धोका दूर झाला आहे, ज्यामुळे बाजार खाली येत होता. परिणामी, आज बाजारात येणारी तेजी लक्षणीय असू शकते, कारण बाजारात सुमारे २ लाख शॉर्ट कॉन्ट्रॅक्ट्स आहेत आणि बाजाराची रचना शॉर्ट-कव्हरिंगसाठी योग्य आहे.”

भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत आशावाद:

मनीकंट्रोलच्या एका वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, “अमेरिका भारतासोबत एक चांगला व्यापार करार करणार आहे”, ज्यामुळे द्विपक्षीय व्यापार कराराबाबत आशावाद दिसून येत आहे आणि याचा गुंतवणूकदारांच्या भावनांवर सकारात्मक परिणार होत आहे.

सकारात्मक जागतिक संकेत:

अमेरिकन बाजारपेठांमध्ये रात्रभरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले, तर वॉल स्ट्रीट फ्युचर्सनेही अमेरिकन बाजारांसाठी सुरुवातीचे मजबूत संकेत दिले, ज्यामुळे देशांतर्गत बाजारांना बळ मिळाले आहे.