Indian Share Market Rally US Election : अमेरिकेच्या २०२६ च्या मध्यावधी निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का बसला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाने सिनेटमध्ये ५१ जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळाला. गुरुवारी (५ नोव्हेंबर २०२६) भारतीय शेअर बाजाराने सलग सहाव्या सत्रात जोरदार मुसंडी मारली. सुरुवातीच्या सत्रातच सेन्सेक्सने १,३८५ अंशांपेक्षा जास्त उसळी घेत ७८,६८६.७३ चा स्तर गाठला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी ५०’ ३८४ अंशांनी वाढून २४,३४४.९० या पातळीवर पोहोचला. गेल्या ६ सत्रात बाजार ६००० अशांहून अधिक वाढला आहे. या तेजीमुळे काही मिनिटांत गुंतवणूकदारांच्या संपत्ती ६.४ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
या प्रचंड वाढीसह शेअर बाजाराचे एकूण मार्केट कॅप ५००.८२ लाख कोटींवर पोहोचले आहे, जे काल (बुधवारी) बाजाराच्या अखेरीस ४९४.४२ लाख कोटी रुपये होते.
भारतीय शेअर बाजारात तेजी का आली?
- अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाने मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या राजकीय घडामोडींमुळे जागतिक शेअर बाजारात तसेच वॉल स्ट्रीटवर मोठी तेजी पाहायला मिळाली.
- युद्ध संपण्याच्या शक्यतेने कच्च्या तेलाचे दर १.०३ टक्क्यांनी घसरून ९३.६५ डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत. तेल आयातीवर अवलंबून असलेल्या भारतासाठी ही अत्यंत दिलासादायक बाब आहे.
- जागतिक वातावरणात सुधारणा झाल्यामुळे एफआयआयने भारतीय बाजारात जोरदार पुनरागमन केलं आहे. गेल्या केवळ चार सत्रांमध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २०,८३४ कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली आहे.
- अमेरिकेतील डाऊ जोन्स निर्देशांकाने गेल्या रात्री १,५६९ अंशांची (३.०३%) विक्रमी झेप घेतली. ५ एप्रिल २०२५ नंतरची ही एका दिवसातील सर्वांत मोठी वाढ ठरली आहे.
कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक तेजी?
आजच्या व्यापारात विशेषत: बँकिंग, ऑटो, आयटी आणि रिअल्टी क्षेत्रातील समभागांमध्ये मोठी खरेदी पाहायला मिळाली. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस २.३१%, निफ्टी ऑटो २.२२%, निफ्टी रिअल्टी २.०८%, निफ्टी आयटी २.०० आणि निफ्टी बँक निर्देशंका १.७३ टक्के इतकी मोठी वाढ नोंदवली गेली.
कोणते समभाग चमकले?
| कंपनी | वाढ (%) |
| इंडिगो | ५.७९ |
| मारुती सुझुकी | ४.३५ |
| बजाज फायनान्स | ४.०० |
| एशियन पेंट्स | ४.२६ |
| अल्ट्राटेक सिमेंट | २.७७ |
याशिवाय एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच टीसीएस आणि इन्फोसिस या मोठ्या समभागांनी बाजाराला मोठा पाठिंबा दिला. स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकांतही १ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली.
तेजी कायम राहील, पण नफा वसुलीची शक्यता
बाजार तज्ज्ञांच्या मते “कच्च्या तेलातील घसरण आणि मजबूत देशांतर्गत आर्थिक पायामुळे परदेशी गुंतवणूकदारांचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. येत्या काळात लार्ज-कॅप समभागांमध्ये आणखी रिकव्हरी पाहायला मिळू शकते. मात्र, उच्च स्तरावर स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून नफा वसुली केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
