Top Gainer Stocks : एप्रिल महिना गुंतवणूकदारांसाठी अत्यंत लाभदायी ठरला आहे. सकारात्मक कॉर्पोरेट निकाल आणि देशांतर्गत गुंतवणुकीच्या जोरावर बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी ५० या निर्देशांकांनी ६ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली. मात्र, खऱ्या अर्थाने या महिन्यात ब्रॉडर मार्केटने बाजी मारली आहे. बीएसई मिडकॅप सिलेक्ट इंडेक्स १५ टक्क्यांनी, तर स्मॉलकॅप इंडेक्स १८ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. त्यामुळे ज्यांनी योग्य शेअरवर पैसे लावले असतील ते केवळ एका महिन्यात श्रीमंत झाले आहेत.
१ लाखाचे १,७०,००० रुपये
एप्रिल महिन्यातील तेजी इतकी व्यापक होती की, बीएसई ५०० इंडेक्समधील तब्बल ४७५ शेअर्स (सुमारे ९५ टक्के) हिरव्या निशाणीत बंद झाले. यापैकी २० समभागांनी ४० टक्क्यांहून अधिक परतावा दिला असून, काहींनी तर ७० टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे. म्हणजे एखाद्या गुंतवणूकदाराने १ एप्रिलला १,००००० रुपये गुंतवले असते तर तो आज १,७०,००० रुपयांचा मालक झाला असता.
मल्टीबॅगर परतावा देणारे शेअर्स कोणते
एचएफसीएल : ७१ टक्क्यांच्या वाढीसह हा शेअर सर्वात आघाडीवर राहिला; याची किंमत ६८ रुपयांवरून ११६ रुपयांवर पोहोचली.
ओला इलेक्ट्रिक : सर्वांनी दुर्लक्षित केलेल्या या शेअरने ६० टक्क्यांहून अधिक वाढीसह २३ रुपयांवरून ३७ रुपयांवर झेप घेतली.
कोहान्स लाइफसायन्सेस आणि सेमइंडिया प्रोजेक्ट्स : यांनी देखील सुमारे ६० टक्क्यांचा परतावा दिला.
इतर महत्त्वाचे शेअर्स : वेल्सपन कॉर्प, अदानी ग्रीन एनर्जी, कोचीन शिपयार्ड आणि गार्डन रीच शिपबिल्डर्स यांसारख्या शेअर्समध्ये ४५ ते ५५ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली.
परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीने चिंता
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, भारताचा आर्थिक पाया भक्कम असला तरी परदेशी गुंतवणूकदार सातत्याने विक्री करत आहेत. महागडे मूल्य, भू-राजकीय अनिश्चितता आणि कच्चे तेल महाग झाल्यामुळे भारताच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रामुख्याने अमेरिका-इराण तणावामुळे कच्च्या तेलाचे दर वाढणे ही भारतासाठी चिंतेची बाब आहे.
ब्रोकर्सचा सल्ला काय?
इन्वेस्टेकने वेल्सपन कॉर्पसाठी १,२६२ रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह ‘बाय’ रेटिंग दिले आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने अदानी ग्रीन एनर्जीसाठी १,३१५ रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह ‘अॅड’ रेटिंग दिले आहे. अँटिक स्टॉक ब्रोकिंगने जीआरएसईसाठी ‘बाय’ आणि कोचीन शिपयार्डसाठी ‘होल्ड’ची शिफारस केली आहे. येस सिक्युरिटीजने अदानी पॉवरबाबत सावध भूमिका घेतली आहे.
घसरण झालेले शेअर्स
तेजीच्या या लाटेतही काही बड्या कंपन्यांच्या शेअर्सवर दबाव राहिला. यामध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीज सुमारे ११ टक्क्यांनी घसरला. तसेच इन्फोसिस, मँगलोर रिफायनरी आणि युनायटेड ब्रुअरीज यांसारख्या शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली.
शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती केवळ शैक्षणिक आणि विश्लेषणात्मक उद्देशाने दिली आहे.
